पोलिसांनी फलकावर कागद चिकटवल्याने हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांचा रास्ता रोको
बसवेश्वर चौक परिसरात काहीकाळ गोंधळ
बेळगाव : सध्या वक्फ बोर्डविरुद्ध सर्वत्र असंतोष आहे. ‘वक्फ हटाव, देश बचाव’ या मागणीसाठी हिंदू संघटनांनी सर्वत्र आंदोलन सुरू केले आहे. बेळगाव येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बसवेश्वर चौक (गोवावेस) परिसरात लावण्यात आलेल्या फलकावरील वक्फ बोर्ड या नावावर पोलिसांनी कागद चिकटवल्याने काही काळ गोंधळ उडाला. हा प्रकार हिंदू संघटनांच्या निदर्शनास येताच बसवेश्वर चौक परिसरात कृष्ण भट यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. कार्यकर्त्यांनी रस्ता अडवताच टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजेरी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. कार्यकर्ते व पोलीस अधिकारी यांच्यात कागद चिकटवल्यावरून वादंग झाला.
बेळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर वक्फ बोर्डची नावे चढविण्यात आली आहेत. याविरुद्ध मंगळवार दि. 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यान येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत कोल्हापूर येथील कणेरी मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी उपस्थित राहणार आहेत. या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर हिंदू संघटनांनी वेगवेगळ्या ठिकाणी ‘वक्फ बोर्ड हटाव, देश बचाव’ असे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर वक्फ बोर्डचा उल्लेख करण्यात आला आहे. टिळकवाडी पोलिसांनी त्यावर कागद चिकटवल्याने रास्ता रोको करण्यात आला. अप्रिय घटना घडू नये म्हणून आम्ही कागद चिकटवल्याचे सांगत पोलीस अधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.