श्रीनिवास नाईक यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांची निदर्शने
कारवार : भटकळ येथील हिंदू संघटनेचे कार्यकर्ते श्रीनिवास नाईक यांच्यावर पोलिसांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भटकळ शहर पोलीस ठाण्यासमोर हिंदू संघटना आणि भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. निदर्शने आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण यांनीच नाईक यांच्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान बुधवारी भटकळ येथे दाखल झालेले नारायण यांनी नाईक यांच्यावर हल्ला करण्यात आलेला नाही. हे सर्व नाटक आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणाबद्दल समजलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी शिर्सी येथे जिल्ह्यातील राऊडी शिटरना बोलविण्यात आले होते.
यावेळी भटकळ येथील हिंदू संघटनेचे कार्यकर्ते श्रीनिवास नाईक यांनाही बोलाविण्यात आले होते. परेडसाठी नाईक शिर्सीला गेले असता त्यांच्यावर कारवार जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण यांनी हल्ला चढविला असा आरोप करण्यात आला आहे. परेडनंतर भटकळला दाखल झालेले नाईक उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. नाईक यांना जिल्हा पोलीसप्रमुखांनी मारहाण केल्याचे वृत्त पसरताच मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवारी रात्रीच हिंदू आणि भाजप कार्यकर्ते जमा झाले आणि त्यांनी काहीवेळ भटकळ येथे राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 वर रास्तारोको केला. शिवाय भटकळ शहर पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला.
नाईक यांच्यावर हल्ला केला नाही, सर्व नाटक
दरम्यान जिल्हा पोलीसप्रमुख एम. नारायण यांनी आपण श्रीनिवास नाईक यांच्यावर हल्ला केला नाही. ते सर्व नाटक असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. नाईक यांना केवळ वार्निंग दिल्याचे स्पष्ट करुन नारायण पुढे म्हणाले, जिल्ह्यात एकूण 996 राऊडी शिटरची यादी तयार करण्यात आली आहे. या सर्वांवर पोलिसांची बारीक नजर आहे. मंगळवारी शिर्सा येथे राऊडी शिटरना परेडला बोलावून केवळ वार्निंग देण्यात आली आहे. नाईक यांनी उपचारासाठी दाखल होऊन खोटे आरोप केले आहेत.