हिंदू दांपत्याची बांगलादेशात हत्या
वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशात एका हिंदू वृद्ध स्वातंत्र्यसैनिकाची त्याच्या पत्नीसह गळे चिरुन हत्या करण्यात आली आहे. ही हत्या या दांपत्याच्या रंगपूर येथील घरात करण्यात आली. जोगेशचंद्र रॉय असे या स्वातंत्र्यसैनिकाचे नाव असून त्यांचे वय 75 वर्षांचे होते. त्यांच्या पत्नीचे नाव सुबोर्ना रॉय असल्याची माहिती देण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात अद्याप कोणाविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. तसेच कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या दांपत्याची दोन मुले बांगला देश पोलीस विभागात अधिकारी पदावर आहेत, असेही स्पष्ट झालेले आहे.
बांगलादेशात सध्या मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वात अंतरिम प्रशासन काम करत आहे. हे प्रशासन सत्तेवर आल्यापासून तेथे हिंदू समाजातील लोकांची हत्या होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. हिंदेच्या हत्या, हिंदू महिलांची अपहरणे आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार अशा प्रकारांना ऊत आला आहे. रॉय दांपत्याची हत्येने तेथील विदारक परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.
पोलिसांच्याही हत्या
एक वर्षापूर्वी बांगला देशात शेख हसीना यांच्या विरोधात उग्र आणि हिंसक आंदोलन झाले होते. या आंदोलनात अनेक पोलिसांच्याही हत्या करण्यात आल्या होत्या. तसेच अनेक पोलिस अधिकारी आणि पोलीस अद्याप बेपत्ता आहेत. त्यामुळे बांगला देशात आजही पोलीस दहशतीच्या छायेत असून पूर्ण पोलीस बळाशिवायच हा देश काम करीत आहे. हसीना सरकारचे पतन झाल्यानंतरच्या एक वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात हिंदूंच्या हत्या झाल्या असून अल्पसंख्याकांची स्थिती दयनीय झाली आहे. त्यांच्या संरक्षणाची कोणतीही शाश्वती राहिली नसल्याने ते जीव मुठीत धरुन जगत आहेत, असे तेथील अल्पसंख्याकांच्या संघटनांच्या नेत्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात युनूस प्रशासन पूर्णत: अयशस्वी ठरल्याचे दिसून येते, अशी वस्तुस्थिती दिसून येत आहे.
हिंदू संघटनांची निदर्शने
जोगेशचंद्र रॉय आणि सुबोर्ना रॉय यांच्या हत्येच्या निषेधार्थ बांगलादेशात अनेक स्थानी हिंदू समाजाच्या संघटनांनी निदर्शने केली. युनूस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. अल्पसंख्याक समुदायांच्या रक्षणाचे उत्तरदायित्व युनूस प्रशासनावर असूनही ते आपले कर्तव्य बजावण्यात टाळाटाळ करीत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.