हिंडलगा-सुळगा रस्ता रुंदीकरण,नूतनीकरण कामास सुरुवात
रस्त्याच्या दुतर्फा असलेले वृक्ष तोडण्यास प्रारंभ : महाराष्ट्र हद्दीपर्यंत रस्ता करण्याची मागणी
वार्ताहर/उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील हिंडलगा ते सुळगा या पट्ट्यातील रस्ता रुंदीकरण आणि नूतनीकरण करण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरुवात केली असून सुळगा येथील रस्त्याच्या दुतर्फा असलेली मोठे वृक्ष तोडण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बेळगाव-वेंगुर्ले रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. सदर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी या भागातील असंख्य प्रवासी आणि नागरिकांतून करण्यात येत होती. अनेक वेळेला निवेदने, रास्ता रोको, वृक्षारोपण असे अनेक निषेधार्ह कार्यक्रम हाती घेण्यात आले. मात्र या कामाला म्हणावी तशी गती अद्याप आलेली नाही. सध्या हिंडलगा ते सुळगा नाल्यापर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी झाडांची तोडणी सुरू केली आहे. सदर कामाची पाहणी समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी बुधवारी सकाळी करून त्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र या भागातील तमाम प्रवासी व नागरिकांची मागणी ही चौपदरीकरण बेळगाव ते कर्नाटक महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या रस्त्याची आहे. चौपदरीकरण केल्याशिवाय या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार नाही. यासाठी शासनाने तातडीने यावर निर्णय घ्यावा आणि बेळगाव-बाची कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या संपूर्ण 15 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे चौपदरीकरण करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.