For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंडलगा पंपिंग स्टेशनला पाण्याचा वेढा

11:39 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंडलगा पंपिंग स्टेशनला पाण्याचा वेढा
Advertisement

बेळगाव : मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने मार्कंडेय नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. परिणामी हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले आहे. एलअॅण्डटी कंपनीकडून गुरुवारी पंपिंग स्टेशनमधील साहित्य हलविण्याचे काम हाती घेण्यात आले. 2019 मध्ये पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरून फटका बसला होता. त्यानंतर आता पुन्हा यंदा पंपिंग स्टेशन परिसराला पाण्याचा वेढा आला आहे.

Advertisement

राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे जलाशय पूर्णपणे भरला आहे. अतिरिक्त पाण्याचा विसर्ग मार्कंडेय नदीपात्रात केला जात आहे. पावसाचा जोर कायम असल्याने जलाशयाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने शहरातील पाणीपुरवठ्यातही व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विविध भागातील पाणीपुरवठा ठप्प होणार आहे. शिवाय काही ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहनही एलअॅण्डटीने केले आहे. एलअॅण्डटी कंपनीच्या पथकाने गुरुवारी सकाळी हिंडलगा पंपिंग स्टेशन आवाराची पाहणी करून पंपिंग स्टेशनमधील साहित्य हलविण्याचे काम हाती घेतले आहे. मागील चार दिवसांपासून नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीशेजारीच असलेल्या पंपिंग स्टेशन आवारात पाणी शिरले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पंप आणि इतर साहित्य इतरत्र हलविले जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.