हिंडाल्कोची विकास योजनेची आखणी
10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक : भारतासह जगभरात करणार विस्तार
वृत्तसंस्था/ मुंबई
आदित्य बिर्ला समूहातील हिंडाल्को इंडस्ट्रीजने पुढील पाच वर्षांत विकासाचे नियोजन केले आहे. भारतीय आणि जागतिक कामकाजात (नोव्हेलिसिसद्वारे) अॅल्युमिनियम, तांबे आणि स्पेशॅलिटी अॅल्युमिनामधील मूल्य साखळी वाढविण्यासाठी 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या 66 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) भागधारकांना संबोधित करताना, समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला म्हणाले की, या विस्तार मोहिमेमुळे कंपनीचे व्यवसाय बळकट होतील आणि हिंडाल्को इंडस्ट्रीजला भारताच्या औद्योगिक विकासात आघाडीचे स्थान मिळेल. भारतात, कंपनी अॅल्युमिनियम आणि तांबे वितळवण्याच्या क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीद्वारे तिच्या क्षमता दुप्पट करत आहे.
बिर्ला म्हणाले की, तांबे श्रेणीतील दहेज येथील कंपनीच्या 3,00,000 टन क्षमतेच्या स्मेल्टरचा विस्तार सुरू आहे. पूर्ण झाल्यावर, चीनबाहेर जगातील सर्वात मोठे तांबे वितळवणारी कंपनी बनेल. शहरीकरण, डिजिटायझेशन, अक्षय ऊर्जेचा वापर आणि इलेक्ट्रिक वाहनांमुळे भारतात तांब्याची मागणी झपाट्याने वाढत असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. याशिवाय, कंपनी आदित्य येथील अॅल्युमिनियम स्मेल्टरचा वार्षिक 1,80,000 टनांपर्यंत विस्तार करत आहे.