हिंडाल्को करणार 45 हजार कोटीची गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आदित्य बिर्ला समूहाचे चेअरपर्सन कुमार मंगलम बिर्ला यांनी अलीकडेच हिंडाल्कोकडून 45 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. अॅल्युमिनियम, तांबे यासारख्या व्यवसायामध्ये विस्तार करण्यासाठी कंपनी वरील गुंतवणूक पुढील तीन ते चार वर्षांमध्ये टप्याटप्याने करणार असल्याचे समजते.
तांबे, अॅल्युमिनीयम उत्पादनात घेणार वेग
हिंडाल्को कंपनीच्या नव्या लोगोच्या अनावरण करण्याच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असणाऱ्या तांब्याच्या फॉइलची निर्मिती करणारी हिंडाल्को ही भारतातील पहिलीवहिली कंपनी आहे. चीननंतर पाहता दुसरी सर्वात मोठी तांब्याच्या फॉईलची निर्मिती करणारी कंपनी मानली जात आहे. अॅल्युमिनियम व्यवसाय देखील गेल्या काही कालावधीमध्ये झपाट्याने विकसित झाला असून आज तो 3000 टनावरून 3.7 दशलक्ष टनांवर पोहोचला आहे. जागतिक स्तरावर पाहता आघाडीवरच्या तीनमध्ये कंपनीचा समावेश झाला आहे, अशीही माहिती आहे.
विविध क्षेत्रात व्यवसायावर भर
आदित्य बिर्ला समूहातील हिंडाल्को इंडस्ट्रीज ही सहकारी कंपनी आहे. गुजरातमधील पाखरजण येथेही एक प्रकल्प कंपनी स्थापन करणार असून त्यासाठी दोन हजार कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार आहे. कंपनी येणाऱ्या काळात इव्ही मोबिलिटी, नूतनीकरणयुक्त ऊर्जा, ऊर्जा साठवण, सेमीकंडक्टर आणि उच्च दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक संदर्भातील व्यवसायामध्ये लक्ष घालणार असल्याचे सांगितले जात आहे.