हिना शहाब, ओसामाचा राजदप्रवेश
वृत्तसंस्था/पाटणा
बिहारमधील विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वी राज्यात मोठी घडामोड दिसून आली आहे. बिहारमधील बाहुबली नेते राहिलेले माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या पत्नी हिना शहाब आणि त्यांचे पुत्र ओसामा यांनी राजदमध्ये प्रवेश केला आहे. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी ओसामा आणि हिना शहाब यांना पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले आहे. बिहारमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून राज्यात आतापासूनच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारमध्ये मुस्लीम मतपेढी अत्यंत महत्त्वपूर्ण असून सर्वच पक्ष त्यावर स्वत:चा प्रभाव निर्माण करू पाहत आहेत. काही प्रमाणात मुस्लीम मतपेढी स्वत:पासून दुरावल्याचा संशय असल्याने राजदने हिना शहाब आणि त्यांचे पुत्र ओसामा यांना पक्षात प्रवेश देत मुस्लीम समुदायाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. सांप्रदायिक शक्तींच्या विरोधात मिळून लढण्याची राजदची प्रतिबद्धता अत्यंत जुनी आहे. हिना शहाब आणि ओसामा यांची साथ मिळाल्याने पक्षाला मजबुती मिळणार आहे. बिहारची जनता शांतता अन् समृद्धी इच्छित असून राजद याकरता शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे उद्गार तेजस्वी यादव यांनी काढले आहेत.
मुस्लीम मतांवर नजर
तेजस्वी यादव हे स्वत:च्या पक्षाची पारंपरिक मुस्लीम-यादव मतपेढी एकजूट राखू इच्छित आहेत. ओसामा शहाब हे राजदमध्ये सामील झाल्याने पक्षाला मुस्लीम मतदारांमध्ये स्थान निर्माण करता येणार असल्याची अपेक्षा त्यांना आहे. दिवंगत मोहम्मद शहाबुद्दीनचा परिवार हा मागील काही काळापासून राजदवर नाराज होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान राजदने हिना यांना उमेदवारीचा प्रस्ताव दिला होता, परंतु त्यांनी राजदची उमेदवारी नाकारली होती. त्या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या, परंतु त्यांना विजय मिळविता आला नव्हता.
लालूप्रसादांचा पुढाकार
परंतु अखेर लालूप्रसाद यांनी स्वत:च्या पक्षाला निर्माण झालेला धोका ओळखत शहाबुद्दीन यांच्या पत्नीचा आणि मुलाचा पक्षप्रवेश घडवून आणला. 8 ऑगस्ट रोजी लालूप्रसाद यादव आणि हिना शहाब यांची भेट झाली होती. पक्षाला मिळणारा मुस्लीम मतदारांचा पाठिंबा कायम ठेवण्यासाठी लालूप्रसादांनी हा पुढाकार घेतला होता.