For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅसिनोसाठीच्या डोंगरकापणीचा पर्दाफाश

12:22 PM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
कॅसिनोसाठीच्या डोंगरकापणीचा पर्दाफाश
Advertisement

सुकेकुळण धारगळ येथे खुलेआम डोंगरकापणी : काँग्रेसचे अमित पाटकर यांनी उठविला आवाज, संपूर्ण गोवाभर रान पेटविण्याचा दिला इशारा

Advertisement

पेडणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी काल बुधवारी धारगळ येथे डेल्टा कॉर्पच्या जमिनीत धडक दिल्यानंतर तेथील छुप्या पद्धतीने सुरूअसलेल्या कामाचा पर्दाफाश झाला. घटनेची माहिती मिळताच पेडणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील कामांसंबंधी परवानगीची कागदपत्रे मागितली असता पाटकर यांना मिळू शकली नाही. त्यामुळे पाटकर यांनी याप्रकरणी आपण व काँग्रेस पक्ष गप्प राहणार नसून सरकारविरोधात रान पेटविणार आहोत, असे पाटकर यांनी सांगितले.

यावेळी उत्तर गोवा काँग्रेस अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, पेडणे काँग्रेस गट अध्यक्ष कृष्णा नाईक, काँग्रेस उत्तर गोवा सचिव जितेंद्र गावकर, सरचिटणीस चंदन मांद्रेकर आदी उपस्थित होते. बेकायदेशीरपणे डोंगरकापणीचे काम सुरू आहे, पण कुठलाही माहितीफलक लावलेला नाही. विविध खात्यांच्या परवानगींची माहिती देणारा फलक असणे गरजेचे आहे. या जागेत मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी करून जमिनीचे सपाटीकरण सुरू आहे.

Advertisement

मुख्यमंत्री कुठली संस्कृती दाखवणार

सुकेकुळण धारगळ येथे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या डोंगरकापणी सुरू असून या ठिकाणी कॅसिनोचे जुगारी अड्डे तसेच वेश्या व्यवसाय पेडणे येथील जनतेला पाहिजे आहे, का असा प्रश्न काँग्रेसचे अमित पाटकर यांनी करून पेडणेकर हे शांत आहेत याचा फायदा सरकार घेत आहे. पेडण्याची व गोव्याची संस्कृती म्हणून कॅसिनो आणि वेश्याव्यवसाय मुख्यमंत्र्यांना देशाला आणि जगाला दाखवायचा आहे का असा प्रश्नही पाटकर यांनी यावेळी केला.

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) मंजूरी दिलेल्या डेल्टा कॉर्प कंपनीचे धारगळ येथील नियोजित जागेत बेफामपणे काम सुरू झाले आहे. याठिकाणी डोंगरकापणी सुरू असून पर्यावरणाची मोठी हानी झालेली आहे. या डोंगरकापणीची परवानगी आयपीबीने दिली आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री आणि नगर नियोजनमंत्र्यांच्या संगनमतातून पेडणेकरांना कॅसिनोची ही भेट भाजपने दिली आहे, असा आरोपही पाटकर यांनी केला.

तरीही पेडणकरांचा भाजपला पाठिंबा कसा?

एकीकडे किनारी भागांतील गांव जमीन रूपांतरण करून परप्रांतीय बिल्डरांची मर्जी राखली जात आहे तर अंतर्गत भागांत ‘कॅसिनो सिटी’ सारखे प्रकल्प आणून पेडणेकरांना देशोधडीला लावण्याची योजना भाजप आखत आहे. एवढे करूनही पेडणेकरांचा भाजपला पाठींबा कसा काय मिळतो, याचे आश्चर्य वाटते, असे पाटकर म्हणाले. या सगळ्या गोष्टी पेडणेकरांना मान्य आहेत काय, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या या स्वार्थी राजकारणाला पेडणेकरांनी वेळीच रोखले नाही तर या भागांतून पेडणेकर देशोधडीला लागतील,अशी टीकाही अमित पाटकर यांनी केली. यावेळी बोलताना जितेंद्र गावकर म्हणाले की धारगळमध्ये मोठ्याप्रमाणात डोंगरकापणी होत असून सरकारी अधिकाऱ्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. हे अधिकारी बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गास शेजारी हे डोंगरकापणीचे काम सुरू असून यावर आता सरकारने कारवाई करावी, असे गावकर म्हणाले.

Advertisement
Tags :

.