For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदी महासागरात बांगलादेशी जहाजाचे अपहरण

06:13 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंदी महासागरात बांगलादेशी जहाजाचे अपहरण
Advertisement

सोमालियन सागरी चाच्यांचे कृत्य : 4 महिन्यांत जहाज अपहरणाचा 20 वा प्रयत्न

Advertisement

वृत्तसंस्था/ मोगादिशू

हिंदी महासागरात सोमलियाच्या सागरी चाच्यांनी एका बांगलादेशी जहाजाचे अपहरण केले आहे. सोमालियाची राजधानी मोगादिशूपासून पूर्व दिशेला सुमारे 1100 किलोमीटर अंतरावर हा हल्ला झाला आहे. अब्दुल्लाह असे नाव असलेले हे जहाज मोझाम्बिक येथून संयुक्त अरब अमिरातच्या दिशेने प्रवास करत होते.

Advertisement

15-20 सागरी चाच्यांनी शस्त्रास्त्रांच्या मदतीने या जहाजावर मंगळवारी हल्ला केला. या जहाजातून सुमारे 55 हजार टन कोळशाची वाहतूक केली होती. चालक दलाच्या सदस्यांमध्ये 23 बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांसोबत हे जहाज सोमालियाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न सागरी चाच्यांनी चालविला आहे.

चालक दलाचे सर्व सदस्य सुरक्षित

जहाजाची कंपनी कबीर स्टील री-रोलिंग मिल्सने जहाजाचे अपहरण झाल्याची पुष्टी दिली आहे. सध्या चालक दलाचे सर्व सदस्य सुरक्षित असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्सने क्षेत्रातून ये-जा करणाऱ्या अन्य जहाजांना खबरदारी बाळगण्यास सांगितले आहे. तसेच याप्रकरणी आम्ही चौकशी करत आहोत असे कंपनीचे सल्लागार मिजानुल इस्लाम यांनी सांगितले आहे.

सागरी चाच्यांच्या कारवायांमध्ये वाढ

आफ्रिकेतील मेरीटाइम सिक्युरिटी सेंटर आता युरोपच्या अँटी-पायरेसी ऑपरेशन्स टीमसोबत मिळून सागरी चाच्यांना ट्रॅक करत आहे. मागील वर्षी नोव्हेंबरपासून आतापर्यंत एडनच्या आखातात 20 वेळा जहाजाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचे एजेन्सीकडून सांगण्यात आले. इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून अरबी समुद्र आणि लाल समुद्रात व्यापारी जहाजांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत.

भारतीय जहाजांवरही हल्ला

सागरी चाच्यांनी आतापर्यंत 5 वेळा चालक दलाचे सदस्य भारतीय असलेल्या जहाजांवरही हल्ले केले आहेत. यापूर्वी 4 जानेवारी रोजी भारतीय नौदलाने सागरी चाच्यांच्या तावडीतून एका जहाजाला मुक्त करविले होते. लायबेरियाचे ध्वज असलेल्या या जहाजाचे नाव लीला नोर्फोर्क होते. जहाजाने ब्रिटनच्या मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स पोर्टलवर एक संदेश पाठविला होता .यात 5-6 सागरी चाच्यांनी शस्त्रास्त्रांसह जहाजावर हल्ला केल्याचे म्हटले गेले होते. अपहरणाची माहिती मिळताच भारतीय नौदलाकडून आयएनएस चेन्नईला जहाजाच्या रक्षणासाठी रवाना करण्यात आले होते. नौदलाची मोहीम 5 जानेवारी रोजी पूर्ण झाली होती. यादरम्यान 15 भारतीयांसमवेत चालक दलाच्या सर्व 21 सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते.

Advertisement
Tags :

.