भारताकडे येणाऱ्या मालवाहू जहाजाचे अपहरण
येमेनमधील हुती बंडखोरांचे कृत्य : इराणचा सहभाग असल्याचा इस्रायली सैन्याचा दावा
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
येमेनच्या हुती बंडखोरांनी रविवारी तुर्कस्तानहून भारतात येणाऱ्या एका जहाजाचे अपहरण केले. लाल समुद्रात ओलीस ठेवलेल्या 620 फूट लांबीच्या मालवाहू जहाजाचे नाव गॅलेक्सी लीडर असून त्यात 25 क्रू मेंबर आहेत. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युव्रेन, बल्गेरिया, फिलिपाईन्स आणि मेक्सिकोचे नागरिक या जहाजावर आहेत. त्याचवेळी इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने ही एक दहशतवादी घटना असल्याचे सांगत त्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे.
अपहरणाच्या या घटनेपूर्वी हुती गटाने इस्रायली जहाजांवर हल्ले करण्याचा इशारा दिला होता. इस्रायलच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जहाजांना लक्ष्य केले जाईल, असे हुती बंडखोरांच्या प्रवक्त्याने सांगितले होते. तथापि, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हे जहाज आपले नाही आणि जहाजावर एकही इस्रायली किंवा भारतीय नागरिक नसल्याचे म्हटले आहे. कतारी मीडिया हाऊस अल-जजीराने दिलेल्या माहितीनुसार हे मालवाहू जहाज ब्रिटनचे असून ते जपानी कंपनी चालवत आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसनुसार, इस्रायली उद्योगपती अब्राहम उंगार हे त्याचे आंशिक भागधारक आहेत. सध्या ते एका जपानी कंपनीला भाडेतत्त्वावर देण्यात आले होते.