For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्लायओव्हरसाठी महामार्ग प्राधिकरणाचे पथक लवकरच दिल्लीला

10:48 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
फ्लायओव्हरसाठी महामार्ग प्राधिकरणाचे पथक लवकरच दिल्लीला
Advertisement

शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा : लोकसभा निवडणुकीमुळे प्रक्रियेला ब्रेक

Advertisement

बेळगाव : शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी गेल्या अर्थसंकल्पात फ्लायओव्हर निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याला केंद्रीय अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण धारवाड विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतरच फ्लायओव्हरच्या कामाच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. लवकरच अधिकाऱ्यांचे पथक दिल्लीला रवाना होणार असल्याचे प्राधिकारच्या अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे.

राज्य सरकारकडून बेळगावला दुसरी राजधानी म्हणून पाहिले जाते. सुवर्ण विधानसौध निर्माण करण्यात आल्यानंतर शहराचे महत्त्व वाढले आहे. मात्र शहरातील वाहतूक केंडीची समस्या गंभीर असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी विविध उपाययोजन राबविल्या जात आहेत. रिंगरोडसह फ्लायओव्हर निर्माण करण्याची योजना आखण्यात आली आहे. राज्य सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात साडेचार कि. मी. फ्लायओव्हर निर्माण करण्यासाठी 450 कोटी निधीची तरतूद केली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शहराच्या दौऱ्यावर आले असताना विविध विकासकामांचा शुभारंभ करून फ्लायओव्हर निर्माण करण्यासाठी हिरवा कंदील दिला होता. तर सदर फ्लायओव्हर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून निर्माण करणार असल्याची घोषणाही केली होती. सदर फ्लायओव्हर निर्माण करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाकडून दिल्ली दरबारी हालचाली गतिमान केल्या होत्या. जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क ठेवला आहे. याबाबत अनेकवेळा बैठकाही घेण्यात आल्या आहेत.

Advertisement

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सदर फ्लायओव्हर निर्माण करण्याच्या प्रकल्पाला आचारसंहितेमुळे ब्रेक लागला होता. आता आचारसंहिता उठविण्यात आली आहे. केंद्रामध्ये पुन्हा भाजप सरकार सत्तेत आले आहे. अवजड व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सदर खात्याचा भार सोपविण्यात आल्याने फ्लायओव्हरच्या कामाला गती मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धारवाड येथील विभागाकडून यासाठी पाठपुरावा केला जात आहे. लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली जाणार आहे. यासाठी लवकरच प्राधिकरणाचे पथक दिल्लीला रवाना होणार आहे. केंद्रीय मंत्र्यांची वेळ घेऊन बैठकीचे नियोजन करून फ्लायओव्हरच्या कामाचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.