Satara Rain Update : साताऱ्यात धुवांधार, महाबळेश्वर तालुक्यात सर्वाधिक 346.1 मिमी पावसाची नोंद
सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तालुक्यात पडल्याची अधिकृत नोंद झाली
सातारा : सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर वाढत आहे. दरम्यान, घाटमाथ्यावर पावसाची रिपरिप अजूनही सुरुच आहे. यंदा मे महिना संपायच्या आधीच पावसाने सुरुवात केल्याने शेतीची कामे खोळंबली आहे. यातच आतापर्यंत सातारा जिल्ह्यात पडलेल्या पावसात सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तालुक्यात पडल्याची अधिकृत नोंद झाली आहे.
26 मे 2025 रोजी सकाळी दहावाजेपर्यंतच्या हवामान खात्याच्या अहवालानुसार, महाबळेश्वर तालुक्यात तब्बल 346.1 मिमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस या तालुक्यात झाला आहे. या पावसामुळे महाबळेश्वर परिसरातील वेण्णा नदी, लिंगमळा धबधबा आणि इतर नाले ओसंडून वाहत आहेत.
पर्यटकांचे आकर्षण असलेले धबधबे पुन्हा एकदा सजीव झाले असून थंडीच्या सरी अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. सातारा जिल्ह्यात सरासरी 858.8 मिमी पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये 10 ते 11 पावसाळी दिवसांची नोंद झाली आहे.
कोयना, नवजा व महाबळेश्वर परिसरात झालेल्या या पावसामुळे कोयना जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवणूक झाली आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी विसर्ग काही ठिकाणी बंद करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात देखील पावसाची शक्यता असल्यामुळे प्रशासन आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तुलनात्मकदृष्ट्या इतर तालुक्यांमध्ये पडलेल्या पावसाचे आकडे असे आहेत:
- महाबळेश्वर – ३४६.१ मिमी
- जावळी – ३१२.६ मिमी
- सातारा – २७३.४ मिमी
- पाटण – २५४.९ मिमी
- कराड – २१८.७ मिमी
- खटाव – २६७.५ मिमी
- कोरेगाव – २१७.७ मिमी
- माण – २७६.२ मिमी
- फलटण – १०३.३ मिमी
- खंडाळा – २४१.५ मिमी
- वाई – २३०.६ मिमी