अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक : चीनला टाकले मागे
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या विद्यापीठांची निवड करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. इन्स्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशनकडून प्रकाशित ओपन डोर्सच्या अहवालानुसार भारताचे 3.3 लाखाहून अधिक विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. मागील 15 वर्षांमध्ये भारत पहिल्यांदाच अमेरिकेत सर्वाधिक विदेशी विद्यार्थी पाठविणारा देश ठरला आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये चीन या यादीत पहिल्या स्थानावर होता. मागील शैक्षणिक वर्षापासून अमेरिकेत 23 टक्क्यांनी विदेशी विद्यार्थ्याचे प्रमाण वाढले आहे. अमेरिकेत शिकणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची हिस्सेदारी 29 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. भारत आता अमेरिकेत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी अग्रणी देश असल्याचे अमेरिकेच्या दूतावासाने म्हटले आहे.
भारतानंतर याप्रकरणी चीनचा क्रमांक लागतो. चीनचे 2,77,398 विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया (43,149) आणि चौथ्या क्रमांकावर कॅनडा (28,998) आणि पाचव्या क्रमांकावर तैवान (23,157) आहे. ओपन डोर्स अहवालाला इन्स्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशनने प्रकाशित केले आहे. ही संस्था अमेरिकेतील विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येविषयी वार्षिक स्वरुपात अध्ययन जारी करते.
2023-24
शैक्षणिक वर्षात अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या : 3,31,602
पदव्युत्तर अन् पीएचडी स्तरीय विद्यार्थ्यांची संख्या : 1,96,5678
पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या : 36,053
2022-23
शैक्षणिक वर्षात अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या : 2,68,923
2008 नंतर पहिल्यांदाच भारत टॉपवर
भारतातील अमेरिकेच्या दूतावासाकडून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी 2008-09 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण अमेरिकेत सर्वाधिक राहिले होते. अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण आता सर्वाधिक राहिले आहे. अमेरिकेत सामान्य स्वरुपात सप्टेंबरपासून शैक्षणिक सत्राची सुरुवात होते आणि मेपर्यंत हे सत्र चालत असते.