For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-तालिबानमध्ये उच्चस्तरीय चर्चा

07:00 AM Jan 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत तालिबानमध्ये उच्चस्तरीय चर्चा
Advertisement

परस्परसंबंधांवर बोलणी, धोरणपरिवर्तनाची चिन्हे

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

भारत आणि अफगाणिस्तानातील तालिबान प्रशासन यांच्यात प्रथमच उच्चस्तरीय राजनैतिक चर्चा झाली आहे. ही चर्चा बुधवारी दुबई येथे झाली. मात्र ही माहिती गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारताच्या विदेश व्यवहार विभागाचे सचिव विक्रम मिस्त्री आणि अफगाणिस्तानचे कार्यकारी विदेश व्यवहार मंत्री मौलवी अमीर खान मुत्तकी यांनी परस्पर संबंधांविषयी चर्चा केल्याची माहिती देण्यात आली. अफगाणिस्तानला विकासाची आवश्यकता आहे. भारताने या देशाच्या तात्कालिक विकास आवश्यकता लक्षात घेतल्या असून भारत या देशाला साहाय्य करण्यास अनुकूल आहे, असा संदेश मिस्त्री यांनी अफगाणिस्तानला दिला. तर अफगाणिस्ताच्या भूमीचा उपयोग भारताच्या विरोधात करु दिला जाणार नाही, असे आश्वासन अफगाणिस्तानकडून देण्यात आले. ही चर्चा सकारात्मक वातावरणात झाली, असे नंतर दोन्ही देशांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

प्रथमच चर्चा

2021 मध्ये अफगाणिस्तानची सत्ता तालिबानने आपल्या हाती घेतली होती. तेव्हापासून तेथे याच संघटनेचे सरकार आहे. भारताने अद्याप त्या सरकारला मान्यता दिलेली नाही. तथापि, बुधवारी प्रथमच दोन्ही देशांमध्ये उच्च स्तरीय अधिकृत चर्चा झाली आहे. त्यामुळे भारत तालिबानसंबंधी आपल्या भूमिकेत परिवर्तन करण्याचा विचार करत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. अफगाणिस्ताननेही भारताला प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रकल्प सुरु होण्याची शक्यता

अफगाणिस्तानच्या विकासाच्या दृष्टीने भारत नजीकच्या भविष्यकाळात त्या देशात काही महत्वाचे विकास प्रकल्प हाती घेण्याची शक्यता आहे. तसेच सध्या भारताकडून त्या देशाला मिळत असलेली मानवीय साहाय्यता पुढेही दिली जाईल. अफगाणिस्तानात वीज उत्पादन, कृषी, शिक्षण, वैद्यकीय सेवा आदी क्षेत्रात मोठ्या प्रगतीची आवश्यकता असून भारत आपले योगदान देऊ शकतो. यासाठी व्यापक योजनेची आवश्यकता आहे, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे.

चाबहार बंदराचा उपयोग करणार

अफगाणिस्तान हा सर्व बाजूंनी भूमीने वेढलेला देश आहे. त्यामुळे त्याला सागरतट नाही. भारताशी व्यापार करायचा असेल तर या देशाला इराणमधील चाबहार बंदराचा उपयोग करणे आवश्यक आहे. सध्या याच बंदरातून भारताचा अफगाणिस्तानशी व्यापार चालतो. भविष्यातही याच बंदराचा उपयोग करण्यात येईल, या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाल्याची माहिती देण्यात आली.

भारताचे आजवरचे साहाय्य

2021 पासून भारताने अफगाणिस्तानला मोठ्या प्रमाणात मानवीय साहाय्य केले आहे. भारताने या देशाला 50 हजार टन गहू, 300 टन औषधे, 27 टन भूकंपग्रस्तता साहाय्य, 40 हजार लीटर कीटनाशके, पोलिओ लसीच्या 10 कोटी मात्रा, कोरोना लसीच्या 15 लाख मात्रा, अंमली पदार्थांची सवय सुटण्यासाठीची 11 हजार साधने, 1.2 टन स्टेशनरी आणि थंडीपासून संरक्षण करणारी 500 साधने अशी साहाय्यता भारताने गेल्या तीन वर्षांमध्ये केली आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

Advertisement
Tags :

.