‘तरुण भारत’च्या वृत्ताची उच्च न्यायालयाकडून दखल
पणजी : राज्यात अनेक ठिकाणी कायद्याला वाकुल्या दाखवून आणि प्रशासनाकडे कानाडोळा करून उघडरित्या मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत आहे. यंदाच्या वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला आणि नरकासुर दहनाच्या कार्यक्रमावेळी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे खुलेआम उल्लंघन झाले असल्याचे दै. तऊण भारतने पहिल्या पानावर शहराची नावे आणि छायाचित्रासह बातमी दिली होती. नरकासूरच्या नावाखाली पणजी, डिचोली, मडगाव आदी शहरात रात्रभर कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाचा अनेकांना, खास करून आजारी, वृद्ध लोकांना त्रास झाल्याच्या बातमीचे कात्रण काल सोमवारी अमियस क्युरी यांनी न्यायालयापुढे सादर केले आहे. त्यावर पुढच्या सुनावणीवेळी सरकार, पोलिस यंत्रणेकडून उत्तर मिळण्याची शक्यता आहे.
हणजूण येथील क्लबांकडून वाढत्या ध्वनी प्रदूषणबाबत स्थानिक पोलिसांनी तीन क्लबांवर धडक कारवाई करताना त्यातील एका क्लबात सुऊ असलेला संगीत कार्यक्रम बंद करून त्यातील ध्वनी प्रक्षेपण साहित्य जप्त केले. राज्यात अनेक भागात मोठयाने आवाजाची बंदी असूनही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रारी येत असल्याची याचिका डेस्मंड आल्वारीस यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. कायद्याला धाब्यावर बसवून हणजूण येथे उघडरित्या निश्चित मर्यादेबाहेर ध्वनिप्रदूषण होत असल्याने कोणत्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली का, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर उत्तर देताना अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले, की हणजूण येथील ’दियाझ नाईट क्लब’ आणि ‘नोहास’ या दोन अस्थापनांना कारणे दाखवा नोटिस पाठवण्यात आली आहे. ‘सांग्रिया’ या आस्थापनावर परवानगीशिवाय संगीत कार्यक्रम आयोजित केल्याचा पोलिसांनी एफआयआर नोंद केली असून या क्लबातील ध्वनी प्रक्षेपण साहित्य जप्त केले आहे.