मुरुघा मठाधीशांच्या अटक वॉरंटला उच्च न्यायालयाची स्थगिती
बेंगळूर : चित्रदुर्गच्या मुरुघा मठाचे डॉ. शिवमूर्ती स्वामी यांच्याविरुद्धच्या विनाजामीन अटक वॉरंटला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच स्वामीजींची चित्रदुर्ग जिल्हा कारागृहात सुटका करावी, असा आदेश दिला आहे. पोक्सो कायद्यांतर्गत दाखल झालेल्या पहिल्या प्रकरणात उच्च न्यायालयाने मुरुघा स्वामीजींना 16 नोव्हेंबर रोजी सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानुसार त्यांची कारागृहातून सुटकाही करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या पोक्सो प्रकरणात जामीन मिळण्याआधीच त्यांची सुटका झाली. त्यावर सरकारी पक्षाच्या वकिलांनी आक्षेप घेऊन अटक वॉरंटसाठी न्यायालयात विनंती केली. न्यायालयाने स्वामीजींना अटक करण्याचे आदेश चित्रदुर्ग ग्रामीण पोलिसांना दिले. त्यानुसार स्वामीजींना सोमवारी पुन्हा अटक करण्यात आली. त्यांना चित्रदुर्ग द्वितीय अतिरिक्त न्यायालयाने 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. याविरुद्ध स्वामीजींनी त्वरित उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने चित्रदुर्ग जिल्हा न्यायालयाने दिलेलया आदेशाला स्थगिती देऊन स्वामीजींची सुटका करण्याची सूचना दिली आहे.