काँग्रेस आमदाराच्या अटकेचा उच्च न्यायालयाचा आदेश
स्वत: आत्मसमर्पण करा, अन्यथा पोलीस अटक करणार
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने काँग्रेस आमदार धर्म सिंह छौक्कर यांच्या अटकेचा आदेश दिला आहे. उच्च न्यायालयाने हरियाणाच्या समालखाचे आमदार आणि काँग्रेसचे वर्तमान उमेदवार धर्म सिंह यांच्या विरोधातील सुनावणीदरम्यान बुधवारपर्यंत स्वत: आत्मसमर्पण करा किंवा पोलीस अटक करतील असे बजावले आहे.
मतदानाच्या 4 दिवस अगोदर उच्च न्यायालयाने काँग्रेस आमदाराच्या विरोधात हा निर्णय दिला आहे. मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीत हरियाणा सरकार आणि ईडीने छौक्कर यांच्याशी निगडित गुन्ह्यांप्रकरणीच्या खटल्यांचा तपशील न्यायालयासमोर मांडला. अजामिनपात्र वॉरंट जारी होऊन देखील ईडीने छौक्कर विरोधात कारवाई केलेली नाही. छौक्कर हे मतदारसंघात उघडपणे फिरत असल्याचा दावा याचिकाकर्ते वीरेंद्र सिंह यांनी केला होता.
समालखा मतदारसंघातील उमेदवार गुन्हा नोंद होऊनही अटकेच्या भीतीशिवाय निवडणूक लढवत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांसोबत ईडीने देखील आरोपीचा शोध लावण्यास असमर्थन ठरल्याचे न्यायालयात म्हटले आहे. तर दुसरीकडे आरोपी उघडपणे प्रचार करत आहे. तपास यंत्रणा छौक्करसोबत मिळून न्यायालयाची दिशाभूल करत आहेत असे म्हणत याचिकाकर्त्याने ईडीला त्याच्या विरोधात योग्य कारवाई करण्याचा निर्देश देण्याची मागणी केली आहे.