धर्मस्थळ प्रकरणाच्या चौकशीवरील स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली
प्रतिनिधी/ बेंगळूर
धर्मस्थळमध्ये शेकडो मृतदेह पुरल्याच्या आरोपासंबंधी दाखल प्रकरणाच्या तपासाला देण्यात आलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली आहे. त्यामुळे पुन्हा या प्रकरणाचा तपास पुढे सुरू राहणार आहे.
धर्मस्थळ पोलीस स्थानकात आपल्याविरुद्ध दाखल झालेले प्रकरण रद्द करावे, अशी याचिका सामाजिक कार्यकर्ते गिरीश मट्टण्णावर, महेश शेट्टी तिमरोडी, टी. जयंत आणि विठ्ठल गौडा यांनी दाखल केली आहे. सदर याचिकेवर न्यायमूर्ती मोहम्मद नवाज यांच्या एकसदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली.
राज्य सरकारच्यावतीने वकील बी. एन. जगदीश यांनी युक्तिवाद केला. मॅजिस्टेटची परवानगी घेतली नाही अशी खोटी माहिती देऊन प्रकरणाला स्थगिती मिळविली आहे. मॅजिस्टेटकडून परवानगी घेण्यात आली आहे. यासंबंधीच्या आदेशाची न्यायालयात पडताळणी करू शकते. प्रकरणाच्या चौकशीला दिलेली स्थगिती न उठवल्यास तपासात अडथळे निर्माण होतील, त्यामुळे स्थगिती उठवावी, अशी विनंती वकील जगदीश यांनी केली.
वाद-प्रतिवाद झाल्यानंतर न्यायालयाने धर्मस्थळ प्रकरणाच्या चौकशीला दिलेली स्थगिती उठविली. तसेच याचिकाकर्त्यांना (आरोपींना) त्रास देऊ नये, असे निर्देश सरकारला दिले.