महाराष्ट्र, तेलंगणासह चार राज्यात भूकंप
5.3 रिश्टर स्केल तीव्रता : जवळपास 15 सेकंदांपर्यंत हादरे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या अनेक भागात बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली. सकाळी 7.27 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 40 किलोमीटर खाली होता. हा भूकंप 15 ते 20 सेकंद राहिला. यादरम्यान लोकांनी घराबाहेर पडून मोकळ्या मैदानात धाव घेत स्वत:चे संरक्षण केले.
भूकंपामुळे अनेक घरांच्या भिंतींना तडे गेल्याचे प्रकार उघड झाले आहेत. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली आणि छत्तीसगडमधील विजापूर, सुकमा आणि दंतेवाडा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील मुलुग, हैदराबाद, रंगारे•ाr, भद्राद्री कोठागुडेम, खम्मम आणि कृष्णा जिह्यातही लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले.