‘डॅमेज कंट्रोल’साठी हायकमांडची कसरत
असंतुष्ट आमदारांशी राज्य काँग्रेस प्रभारी सुरजेवाला यांची चर्चा : नाराजी दूर करण्याचे प्रयत्न, तक्रारीही घेतल्या जाणून
बेंगळूर : राज्यात मुख्यमंत्री बदल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलासह विविध राजकीय मुद्द्यांवर मंत्री-आमदारांकडून उघडपणे वक्तव्ये होत असतानाच राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी पक्षातील असंतुष्ट आणि नाराज आमदारांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. सरकारविरोधात उघडपणे वक्तव्य करणाऱ्या आमदारांच्या तक्रारी जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. मंगळवार आणि बुधवारीही ते पक्षातील ‘नाराजीनाट्या’वर पडदा टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत. प्रदेश काँग्रेस कार्यालयात सोमवारी रणदीप सुरजेवाला यांनी असंतुष्ट आमदारांच्या तक्रारी आणि समस्या ऐकून घेतल्या. आमदारांची नाराजी दूर करण्याचे आश्वासन दिले. मतदारसंघांच्या विकासासाठी आवश्यक सर्व मदत करण्याची ग्वाही दिली. सरकारच्या कामगिरीबद्दल असमाधानी किंवा नाराज असाल तर ते उघडपणे व्यक्त करू नका, असे सांगून त्यांनी राज्य काँग्रेसमधील गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
गृहनिर्माण योजनांमधील घरांच्या वाटपातील लाचप्रकरणी आमदार बी. आर. पाटील यांनी आरोप केल्यानंतर आमदार राजू कागे, एन. वाय. गोपालकृष्ण यांनी देखील त्यांच्या सुरात सूर मिसळला होता. पक्षातील आमदारांची नाराजी चव्हाट्यावर आल्यानंतर काँग्रेस हायकमांडने सुरजेवाला यांना सूचना देण्याबरोबरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देखील आमदारांची मते जाणून घेण्याचे निर्देश दिले होते. हायकमांडच्या सूचनेवरून सुरजेवाला रविवारी रात्री बेंगळुरात दाखल झाले. सोमवारी त्यांनी बेंगळुरातील काँग्रेस कार्यालयात आमदारांशी चर्चा केली. सोमवारी सुरजेवाला यांनी कोलार, चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील 8 आमदारांशी चर्चा केली. मंगळवारी बेंगळूर ग्रामीण, रामनगर, कोडगू जिल्हा तर 3 जुलै रोजी चिक्कमंगळूर, चामराजनगर, मंड्या, म्हैसूर जिल्ह्यांतील आमदारांशी चर्चा करतील.
मी आणि शिवकुमार एकत्र : सिद्धरामय्या
मी आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार एकत्र आहोत. कोणी काहीही म्हटले तरी आमच्यात मतभेद नाहीत. राज्यातील काँग्रेस सरकार पाच वर्षे दगडासारखे मजबूत राहील, असे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शिवकुमार यांचा हात धरून उंचावून दाखविला. भाजपमधील नेते आमच्यात असंतोष असल्याचे खोटे वृत्त पसरवत आहेत. परंतु, कोणी काहीही बोलले तरी मी आणि शिवकुमार एकत्र आहे. राज्य काँग्रेस प्रभारी सुरजेवाला हे पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव आहेत. ते पक्षसंघटनेचे काम करत आहेत. त्यामुळेच त्यांनी आमदारांसोबत बैठक घेतली आहे. ते त्यांचे काम करत आहेत, असेही सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री बदलाचा निर्णय हायकमांडच्या हाती
राज्यात मुख्यमंत्री बदलण्याचा मुद्दा हायकमांडच्याच हाती आहे. पुढील निर्णय घेण्याचा अधिकार हायकमांडला आहे. मात्र, कोणी अनावश्यक गोंधळ निर्माण करू नये, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली. सुरजेवाला कर्नाटकात आले आहेत. आमदार काय सांगतात,शिवाय कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडल्या, याविषयी ते आमदारांना विचारतील. ते पाहून पुढे काय करायचे हे ठरविता येईल. आमदारांनी कोणकोणती विधाने केली, यावर मी उत्तर देणार नाही. एआयसीसी स्तरावरच उत्तर देईल. येथे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे शक्य नाही, असे खर्गे म्हणाले.
-काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे
प्रसारमाध्यमांवरील वृत्त केवळ तर्क!
प्रसारमाध्यमांवर झळकत असलेले नेतृत्त्वबदलाचे वृत्त केवळ तर्क आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीतील उमेदवार, पराभूत उमेदवारांची बैठकही बोलावणार असून ही निरंतरपणे चालणारी प्रक्रिया आहे. विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहे.
- रणदीप सुरजेवाला, राज्य काँग्रेस प्रभारी