सिद्धरामय्यांना हायकमांडचे अभय
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिली राज्य राजकीय घडामोडींची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
मुडा प्रकरणी सिद्धरामय्यांविरुद्ध राज्यपालांनी खटला चालविण्यास परवानगी दिल्यानंतर राज्य काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी राहण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. या घडामोडींची सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी काँग्रेस हायकमांडची भेट घेऊन माहिती दिली आहे. हायकमांडनेही सिद्धरामय्यांना आम्ही तुमच्यासोबत आहे. खचून जाऊ नका. कोणत्याही कारणास्तव तुमची साथ सोडण्याचा प्रश्नच नाही, असे सांगून त्यांना अभय दिले आहे.
राज्यपालांनी खटल्याला परवानगी दिल्यानंतर राज्यात घडलेल्या घडामोडींविषयी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासमवेत सिद्धरामय्या यांनी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते राहुल गांधी, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला, के. सी. वेणूगोपाल यांची भेट घेऊन माहिती दिली. राज्यपालांनी खटला चालविण्यास परवानगी देण्यामागे असणारे कारस्थान, राज्य काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचे भाजप-निजदचे षड्यंत्र यासह अनेक मुद्दे सिद्धरामय्यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले. मुडा प्रकरणात आपला कोणताही सहभाग नसल्याची जाणीवही त्यांनी वरिष्ठांना करून दिली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माहिती दिल्यानंतर काँग्रेसश्रेष्ठींनी आम्ही तुमच्यासोबत आहे. या बाबतीत साथ सोडणार नाही. संकोच बाळगू नका. खटल्याला कायदेशीर मार्गाने लढा द्या, असे सांगून अभय देण्यात आले.
राज्यपालांच्या भूमिकेविरुद्ध राज्यात काँग्रेस पक्षाने केलेले आंदोलन आणि न्यायालयात दिलेले आव्हान याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी हायकमांडला माहिती दिल्याचे काँग्रेस सुत्रांकडून समजते. हायकमांडच्या भेटीसाठी शुक्रवारी सकाळी सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासमवेत बेंगळूरहून दिल्लीला रवाना झाले. सायंकाळी त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, एआयसीसीचे मुख्य सचिव के. सी. वेणूगोपाल, रणदीप सुरजेवाला यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींची माहिती दिली.
राष्ट्रपतींसमोर परेड करणार?
राज्यातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप-निजदने चालविलेले प्रयत्न चालविले असून याविरोदात राज्य काँग्रेसच्या 136 आमदारांना दिल्लीला बोलावून राष्ट्रपतींची भेट घेऊन चर्चा करण्याविषयी देखील याप्रसंगी चर्चा करण्यात आली. बेंगळूरमध्ये गुरुवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत राज्यपाल गेहलोत यांच्याविरुद्ध राष्ट्रपतींकडे तक्रार करता येईल. राज्यपालांना माघारी बोलावण्याची विनंती राष्ट्रपतींना करता येईल, असा सल्ला देण्यात आला आहे. याविषयी डी. के. शिवकुमार व सिद्धरामय्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. संमती मिळाल्यास सर्व आमदारांना दिल्लीला बोलावून राष्ट्रपतींसमोर परेड करण्याची तयारी असल्याचेही सिद्धरामय्यांनी वरिष्ठांना सांगितल्याचे समजते.
वेट अँड वॉच...
मुख्यमंत्र्यांचे म्हणणे ऐकून वरिष्ठांनी याविषयी अवलोकन करून निर्णय घेण्यात येईल. थोडा वेळ द्या. खटल्याबाबत उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावर कोणता निर्णय येईल, हे पाहूया. त्यानंतर पुढील पाऊल उचलता येईल, असे हायकमांडने सांगितल्याचे सूत्रांकडून समजते.