नेतृत्त्व बदलाविषयी हायकमांडचे स्पष्टीकरण आवश्यक
मंत्री सतीश जारकीहोळी यांचे मत : सिद्धरामय्या हेच पाच वर्षे मुख्यमंत्रिपदावर
बेंगळूर : नेतृत्त्व बदलाविषयी सातत्याने चर्चा होत आहे. यावर हायकमांडने स्पष्टीकरण द्यावे. सध्यस्थिती मी मुख्यमंत्रिपदासाठी तयार होण्याचा प्रश्नच उद्भवलेला नाही. मुख्यमंत्रिपदी सिद्धरामय्या यांचे स्थान अढळ आहे. त्यामुळे पाच वर्षांकरिता तेच मुख्यमंत्री असतील, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. सोमवारी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची आशा बाळगण्यात गैर नाही. मात्र, सध्या सिद्धरामय्या हे मुख्यमंत्रिपदावर आहेत. आता आम्हाला नेतृत्त्व बदलाची परिस्थिती दिसून आलेली नाही.
अहिंद (अल्पसंख्याक, मागासवर्ग, दलित) नेतृत्त्वाचा मुख्यमंत्रिपदाशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरणही मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. विधानपरिषद सदस्य डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या यांच्या विधानाला जे विरोध करत आहेत त्यांनी विधानाचा चुकीचा अर्थ काढला आहे. डॉ. यतिंद्र यांच्या वक्तव्यावर अधिक चर्चा गरजेची नाही. यतिंद्र यांनी अहिंद नेतृत्त्व पुढे चालवणार आहेत, अशा अर्थाने वक्तव्य केले होते. मंत्री डॉ. जी. परमेश्वर, एच. सी. महादेवप्पा यांच्यासह अनेक नेते ‘अहिंद’चा भाग आहेत. अहिंद नेतृत्त्वासाठी अद्याप वेळ जुळून आलेली नाही. सुमारे 50 वर्षांपासून राज्यात अहिंद वर्गाचे संघटन होत आहे, असे त्यांनी सांगितले.
सर्वकाही हायकमांडचा निर्णय
यतिंद्र सिद्धरामय्या यांनी कोठेही मुख्यमंत्रिपद किंवा प्रदेशाध्यक्षपदाविषयी भाष्य केलेले नाही. 2028 च्या निवडणुकीतील स्थिती पाहून निर्णय घेऊया. पक्षाचे हायकमांड कोणाला कोणते पद द्यावे हा निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले होते. दलित व्यक्तीला मुख्यमंत्री बनण्याची संधी येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. सध्यातरी संधी नाही. नोव्हेंबर क्रांती होणार नाही. हायकमांड तशी संधीही देणार नाही, असेही मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.