हॉकर्स अन् पोलिसात लपाछपी
सातारा :
सातारा नगरपालिकेने ‘नो हॉकर्स झोन’ तयार केलेला आहे. त्यातच हट्टाला पेटून विक्रेत्यांनीही आपली दुकाने थाटली गेली होती. त्या दुकानावर कारवाई करण्याच्या सूचना मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी अतिक्रमण हटाव विभागास देवून तो रस्ता मोकळा करावा अशी माहिती विक्रेत्यांना मिळताच त्यांनी आपली दुकाने लावलीच नाहीत. दरम्यान, सगळा मोती चौक ते पाचशे एक पाटी हा रस्ता बुधवारी सकाळपासून मोकळा दिसत होतो. पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक पोहोचले, तेव्हा मात्र, हॉकर्स संघटना व इतर कार्यकर्तेही तेथे आले. त्यातील काहींनी तर ठिणगी टाकून हा प्रश्न कसा पेटेल याकडे प्राधान्य दिले. अतिक्रमण विभाग कारवाईवर ठाम राहिल्याने काही काळ शाब्दीक वादावादी झाली.
सातारा शहरात वाहतुकीची कोंडी मोती चौक ते पाचशे एक पाटी या दरम्यान होत आहे. त्याबाबत उपाययोजना म्हणून सातारा पालिकेने तो रस्ताच ‘नो हॉकर्स झोन’ केलेला आहे. हॉकर्सधारकांनी रस्त्याच्या कडेला विक्रीची दुकाने लावू नयेत अशी मनाई केली आहे. तरीही विक्रेत्यांनी आपली दुकाने लावली गेली होती. त्यावरुन सततच्या स्थानिकांच्या तक्रारीवरुन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी तेथील रस्ता रिकामा करण्याच्या सूचना त्यांनी अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांना दिली. निकम यांनी कारवाई करण्यासाठी पथकाला घेवून जाणार ही माहिती विक्रेत्यांना मिळताच विक्रेत्यांनी दुकानेच लावली नाहीत. किरकोळ एखादे, दुसरे दुकान लागले तेही त्यांनी लगेच काढून घेतले. पथक पोलीस बंदोबस्तात मोती चौक ते पाचशे एक पाटी या रस्त्यावर पोहोचले. त्याची माहिती मिळताच हॉकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष सादिक पैलवान, शहराध्यक्ष संजय पवार यांच्यासह हॉकर्सधारक व इतर संघटनांचे कार्यकर्तेही तेथे पोहोचले.
त्याचवेळी हॉकर्स संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाई करु नका, अशी विनंती केली. त्यावर प्रशांत निकम यांनी मला काही सांगू नका, मला कारवाईचा आदेश आहे मी कारवाई करणार, तुम्ही माझ्याशी बोलू नका, तुम्हाला काय सांगायचे असेल तर ते सीओ साहेबांकडे जावून सांगा, असे सांगताच तेथील हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तेथे एकजण सातारकर आला. त्याने मात्र हॉकर्सधारकांना फुलवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना उद्देशून त्या कार्यकर्त्याने हॉकर्सधारकांवर गुन्हे दाखल करा ना मग, असा सल्ला देत मुख्याधिकारी भेटत नाहीत, तेथे पालिकेत गेल्यावर मीटिंगमध्ये आहे असे सांगतात, असा आरोप केला. त्यावर शाहुपूरी पोलिसांनी त्यांना मुख्याधिकाऱ्यांना भेटा, असा सल्ला देताच तेथून ते पालिकेत गेले. मुख्याधिकारी अभिजित बापट यांची त्या सर्वांनी भेट घेतली. तेथे त्यांचे मुद्दे मुख्याधिकाऱ्यांनी ऐकून घेतले. त्यात काही हॉकर्स संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे बैठकीला आले नाहीत. ते बाहेरच्या बाहेर गेले.
दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये चर्चा होवून त्यामध्ये विक्रेत्यांना मंडईत जागा देण्यात येणार आहे. रस्त्यावर बसण्यापेक्षा तेथे बसा, असे सांगत त्यांनी मंडईतील जागा त्यांना दाखवा, अशा त्यांनी सूचना दिल्या. त्यानुसार मंडईतल्या जागेची पाहणी केली.
- आम्ही तेथे जाणार नाही
पालिकेने मंडईत जागा देण्याचे सुचवले आहे ते आम्हाला मान्य नाही. आम्ही तेथेच बसणार आहे. रस्त्यावरच गिऱ्हाईक होते. तेथे मंडईत कोण खरेदी करायला येणार तिकडे, आम्ही मंडईत जाणार नाही.
संजय पवार, हॉकर्स संघटना शहराध्यक्ष
- इतर संघटनांचा शिरकाव
प्रश्न हॉकर्स संघटनेचा असताना इतर संघटनांनी त्यामध्ये उडी घेतल्याने या प्रश्नासाठी हॉकर्समध्येही दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे हॉकर्स धारकांचे प्रश्न सुटण्याऐवजी प्रश्न आणखी बिकट बनत असल्याची चर्चा सुरु होती.