मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून हिंडलगा मराठी शाळेला हायटेक शौचालय मंजूर
वार्ताहर/हिंडलगा
येथील सरकारी आदर्श प्राथमिक मराठी शाळेला मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या फंडातून हायटेक शौचालय बांधण्यासाठी रुपये 5 लाख 20हजार रक्कम आय.आर.डी.पी. योजनेतून मंजूर केली आहे. या शौचालय बांधकामाचा शुभारंभ दि.10 रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा विकास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश पावशे, उद्घाटक मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे स्वीय सहाय्यक महांतेश वज्रमटी तसेच ग्रा.पं. सदस्य, सदस्या उपस्थित होत्या. मुख्याध्यापक पी.एम. रजपूत यांनी प्रास्ताविक मनोगत व स्वागत केले.
भूमिपूजन महांतेश वज्रमटी यांच्या हस्ते करून उपस्थित ग्रा.पं. सदस्य विठ्ठल देसाई, प्रवीण पाटील, अशोक कांबळे, रामचंद्र कुद्रेमणीकर, प्रवीण पाटील, गजानन बांदेकर, यल्लाप्पा काकतकर, अलका कित्तूर, प्रेमा मिरजकर यांच्या हस्ते कुदळ मारून शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला रमाकांत पावशे, संचालक प्रकाश बेळगुंदकर व निवृत्त मुख्याध्यापक अमृतराव देसाई उपस्थित होते. अमृतराव देसाई यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. आभार सी.आर.पी. सतीश पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन सागर हराडे यांनी केले. कार्यक्रमाला एसडीएमसी उपाध्यक्षा सविता अतवाडकर, सदस्य सुबराव बेळगावकर, ज्योती मेनजे, ललिता मुरगोड, रूपा कम्बाळीमठ उपस्थित होत्या.
विनायकनगर येथे डंपरची वीजखांबाला धडक
बेळगाव विनायकनगर येथे एका डंपरने विजेच्या खांबाला धडक दिल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यामुळे वीजखांबाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु परिसरातील वीजपुरवठा मात्र बराच काळ ठप्प झाला होता. डंपर रिव्हर्स घेताना चालकाला वीजखांबाचा अंदाज न आल्याने धडक बसली. यामुळे काँक्रीटचा वीजखांब मोडला. सुदैवाने वीजवाहिन्या डंपरवर पडल्या नाहीत. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. याची माहिती तात्काळ हेस्कॉमला देण्यात आल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आला. यानंतर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला.