हायटेक टेस्ट ड्राईव्ह ट्रॅक सेन्सरअभावी वापराविना पडून
चार वर्षांपासून अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : गलथान कारभाराचा बसतोय फटका
बेळगाव : बेळगाव आरटीओ विभागाने कोट्यावधी रुपये खर्च करून कणबर्गी-कलखांब येथे वाहन परवाना काढण्यासाठी ड्रायव्हिंग लेन तयार करण्यात आली. परंतु चार वर्षे उलटली तरी याठिकाणी सेन्सर बसविण्यात आले नाहीत. अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे हायटेक टेस्ट ड्राईव्ह ट्रॅक वापराविना पडून आहे. त्यामुळे सरकारी पैसा वाया गेल्याची तक्रार नागरिकांमधून व्यक्त होत आहे. बेळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 2020 मध्ये चार एकर परिसरात सेन्सरवर आधारित हायटेक व्हेईकल ट्रॅक तयार करण्यात आला. यासाठी 8.23 कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु चार वर्षे उलटली तरी अद्याप सेन्सर बसविण्यात आले नाहीत. यामुळे दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांसाठी तीन स्वतंत्र ट्रॅकवर चाचणी घ्यावी लागत आहे.
दुर्लक्षामुळे सेन्सर बसविण्यास विलंब
बेळगाव शेजारी हुबळी-धारवाड प्रादेशिक परिवहन कार्यालयात अशाच मॉडेलवर बांधलेल्या ट्रॅकवर सेन्सरद्वारे चाचणी घेण्यात येते. राज्यात बेंगळूरनंतर बेळगाव, हुबळी-धारवाड येथे सेन्सर ट्रॅकची व्यवस्था केली. हुबळी येथे सेन्सरची व्यवस्था करूनही बेळगावमध्ये मात्र सेन्सर बसविण्याकडे दुर्लक्ष करत आहे. आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच सेन्सर बसविण्यास विलंब होत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
आरटीओ कार्यालयात एजंटराज
प्रादेशिक परिवहन विभाग हा नेहमीच एजंटराजमुळे चर्चेत राहिला आहे. बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या संगनमताने एजंटराज सुरू आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी सेन्सर ड्राईव्ह महत्त्वाचे ठरते. वाहन चालविण्याची चाचणी देताना वाहन चालविणारी व्यक्ती कुठे थांबते, वाहन कशाप्रकारे वळविते, याची माहिती सेन्सरद्वारे नियंत्रण कक्षाकडे पाठविली जाते. त्यामुळे टेस्ट ड्राईव्ह चाचणीत पारदर्शकता राहू शकते. त्यामुळे सेन्सरची गरज आहे.