हायटेक बसस्थानक लवकर सार्वजनिकांसाठी होणार खुले
हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने : अत्याधुनिक सेवांचा अनुभव घेता येणार
बेळगाव : प्रवाशांना सोयीस्कर व समस्याविरहित बससेवा आणि अत्याधुनिक सुविधांचा लाभ व्हावा या उद्देशाने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत अत्याधुनिक सुविधांनीयुक्त बसस्थानक निर्माण केले आहे. ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हायटेक बसस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र त्यानंतरही सार्वजनिकांच्या सेवेसाठी बसस्थानक खुले करण्यात आले नव्हते. पण आता स्मार्ट सिटीकडून बसस्थानक परिवहन मंडळाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून लवकरच हायटेक बसस्थानक सार्वजनिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून हायटेक बसस्थानकाचे काम सुरू होते. चालू वर्षांपासून बसस्थानकाच्या कामाला गती आल्याने प्रलंबित कामे तातडीने करण्यात आली. बसस्थानकात अत्याधुनिक सुविधा प्रदान करण्यात आल्या असून सार्वजनिकांना याचा अनुभव घेता येणार आहे. त्याचबरोबर बसस्थानकाच्या हस्तांतरणानंतर नव्या बसेसचाही ताफा दाखल होणार असून याचा प्रवाशांना लाभ होणार आहे. अद्याप काही किरकोळ कामे राहिली असल्याने हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली होती. मात्र आता बहुतांश कामे आटोपण्यात आली असून लवकरच बसस्थानक सार्वजनिकांच्या सेवेसाठी खुले होणार आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या मार्गासह शहर, उपनगर व ग्रामीण भागासाठी बससेवा पुरविण्यात येते. लांबपल्ल्याच्या बसेससाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. बसस्थानकाचा काही भाग शहर व ग्रामीण भागातील बससेवेसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. मात्र या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने तसेच अपुऱ्या बसेसमुळे प्रवाशांना व विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना बसेसच्या पायऱ्यांवर थांबून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत आही.
मुबलक प्रमाणात बससेवा पुरविण्याची गरज
प्रवासी व विद्यार्थ्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी हायटेक बसस्थानक सुरू होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हायटेक बसस्थानक सार्वजनिकांच्या सेवेसाठी खुले करण्यात आल्यानंतर मुबलक प्रमाणात बससेवा पुरविण्याची गरज आहे. नव्या बसेसचा ताफा जरी दाखल होणार असला तरी शहर व ग्रामीण भागासाठी योग्यरित्या बसेस सोडून मार्गांवर बसफेऱ्याही वाढविण्याची आवश्यकता आहे. अपुऱ्या बससेवेचा सर्वाधिक परिणाम विद्यार्थ्यांवर होत असून त्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येत आहे. यासाठी परिवहन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.