हिजबुल्लाहने इस्रायलवर डागली क्षेपणास्त्र
मध्यपूर्वेतील तणावात भर : मोसादचे मुख्यालय होते लक्ष्य
वृत्तसंस्था/ बैरुत
इस्रायलने बुधवारी लेबनॉनवर अनेक हवाई हल्ले केले आहेत. ज्यानंतर हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी देखील इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमध्ये रॉकेट्स अन् क्षेपणास्त्रs डागली आहेत. दोघांमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघर्ष ठरला आहे.
लेबनॉनमधून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांना हवाई सुरक्षा प्रणालींद्वारे रोखण्यात आले आहे. लेबनॉनच्या एका गावातून क्षेपणास्त्र डागताना हिजबुल्लाहचे लक्ष्य काय होते याची पुष्टी देता येणार नाही. क्षेपणास्त्र तेल अवीवच्या दिशेने डागण्यात आले होते आणि मोसाद मुख्यालय त्या क्षेत्रात नाही असे इस्रायलच्या सैन्याने म्हटले आहे.
तेल अवीवमधील मोसाद मुख्यालयाला लक्ष्य करत आम्ही क्षेपणास्त्रs डागली होती. आम्ही लेबनॉन आणि त्याच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी लढत आहोत असा दावा हिजबुल्लाहने बुधवारी केला आहे. हिजबुल्लाहचे दोन प्रमुख कमांडर्स मंगळवारी मारले गेले होते. दहशतवादी संघटनेने याकरता मोसादला जबाबदार ठरविले आहे.
इस्रायलकडून कारवाई सुरूच
इस्रायलचे सैन्य मागील एक वर्षापासून हिजबुल्लाहचे कमांडर आणि लेबनॉनमधील त्याच्या शस्त्रसाठ्यांना लक्ष्य करत आहे. तर हिजबुल्लाह देखील इस्रायलवर सातत्याने रॉकेट्सचा वर्षाव करत आहे. बुधवारी ख्रिश्चनबहुल केसरवान क्षेत्रात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात तीन जण मृत्युमुखी पडले असून 9 जण जखमी झाल्याचे लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
मागील वर्षापासून संघर्ष
मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये इस्रायलवर हमासकडून मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासविरोधात युद्ध पुकारले होते. गाझापट्टीतील युद्धानंतर हिजबुल्लाहने हमासला समर्थन दर्शवत इस्रायलच्या दिशेने गोळीबार सुरू केला होता.
लेबनॉनमध्ये 569 जणांचा मृत्यू
इस्रायलने आता स्वत:चे लक्ष स्वत:ची उत्तर सीमा आणि दक्षिण लेबनॉनवर केंद्रीत केले आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात लेबनॉनमध्ये 50 मुलांसमवेत 569 जण मारले गेले आहेत. तर 1835 जण जखमी झाले आहेत. लेबनॉनमध्ये सुमारे 5 लाख लोक विस्थापित झाल्याचा अनुमान असल्याचा दावा लेबनॉनचे विदेशमंत्री अब्दुल्ला बौ हबीब यांनी केला आहे.