हिजबुल्ला कमांडर इस्रायलकडून ठार
वृत्तसंस्था/ बैरुत
इस्रायलने दक्षिण लेबेनॉनमध्ये केलेल्या वायुहल्ल्यात हिजबुल्लाचा एक ज्येष्ठ कमांडर ठार झाला आहे. इस्रायलच्या सेनेने ही माहिती बुधवारी दिली. हा हल्ला लेबेनॉनची राजधानी बैरुतनजीकच्या एका उपनगरात करण्यात आला. या उपनगरात फौद शुक्र हा कमांडर लपून बसला आहे, अशी माहिती गुप्तचरांनी दिल्यानंतर त्याला लक्ष्य करण्यात आले, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शुक्र याचा ठावठिकाणा देणाऱ्यास 5 लाख डॉलर्सचे इनाम घोषित करण्यात आले होते.
हिजबुल्लाने अद्याप इस्रायलच्या या प्रतिपादनाला दुजोरा दिलेला नाही. मात्र, शुक्र ज्या इमारतीत वास्तव्याला होता, त्या इमारतीवर इस्रायलच्या विमानांनी हल्ला केल्याचे आणि ही इमारत उद्ध्वस्त झाल्याचे या संघटनेने मान्य केले आहे. अमेरिकेने मात्र शुक्र ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हल्ल्याला जबाबदार
फौद शुक्र हा सोमवारी इस्रायलव्याप्त गोलान टेकड्यांच्या परिसरात हिजबुल्लाकडून करण्यात आलेल्या एका रॉकेट हल्ल्याचा सूत्रधार होता. या हल्ल्यात 12 लोकांचा बळी गेला होता. मृतांमध्ये प्रामुख्याने महिला आणि बालकांचा समावेश होता, अशी माहिती इस्रायलकडून देण्यात आली होती. हिजबुल्लाने आपली मर्यादा ओलांडल्याने हा हल्ला करणे भाग पडले असे प्रतिपादन इस्रायलचे संरक्षणमंत्री युआव्ह गॅलंट यांनी घटनेनंतर केले.
इस्रायलच्या हल्ल्यात अनेक ठार
फौद शुक्र वास्तव्यास असलेल्या इमारतीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचे अनेक हस्तक ठार झाले आहेत, अशी कबुली या संघटनेने दिली आहे. इमारत पूर्णत: उद्ध्वस्त झाली असून तिचे ढिगारे उपसण्याचे काम सुरु आहे. अद्याप शुक्र याचा मृतदेह सापडला नसल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. तथापि, तो ठार झाल्याची माहिती अमेरिकेनेही दिली असून आता इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील व्यापक युद्ध रोखले जाऊ शकते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. व्हाईट हाऊसने यासंबंधी एक वक्तव्य प्रसिद्ध केले आहे.