For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अहो आश्चर्यम! ऑलआऊट 12

06:54 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
अहो आश्चर्यम  ऑलआऊट 12
Advertisement

आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात मंगोलियाची नामुष्कीजनक कामगिरी : जपानचा तब्बल 205 धावांनी विजय  

Advertisement

वृत्तसंस्था/ सानो सिटी, जपान

क्रिकेट हा असा खेळ की ज्यामध्ये कधी काही होईल, हे सांगता येत नाही. यासाठी क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. असाच एका सामना आयसीसीचे सदस्य असलेल्या जपान व मंगोलिया यांच्यात पार पडला. बुधवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यात जपानने विजयासाठी 218 धावांचा पाठलाग करताना मंगोलियाचा संपूर्ण संघ 12 धावांत गारद झाला. जपानने हा सामना तब्बल 205 धावांनी जिंकला. विशेष म्हणजे, जपानचा हा विजय धावांच्या तुलनेत चौथ्या क्रमाकांचा विजय ठरला आहे तर मंगोलियाने टी 20 क्रिकेटमधील दुसरी निच्चांकी धावसंख्या नोंदवली.

Advertisement

सध्या मंगोलियाचा संघ जपान दौऱ्यावर आहे. उभय संघात सात टी 20 सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेतील दुसऱ्या सामना सानो सिटी येथे झाला. या सामन्यात जपानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 217 धावांचा डोंगर उभा केला. जपानकडून सबरेश रविचंद्रनने सर्वाधिक 69 धावा केल्या तर कर्णधार केंडल फ्लेमिंगने 32 धावांचे योगदान दिले. इब्राहिम ताकाहाशीने 31 धावा फटकावल्या.

या लक्ष्याचा पाठलाग करताना मंगोलियाचा संपूर्ण संघ 8.2 षटकांत 12 धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यात मंगोलियाच्या सहा खेळाडूंना भोपळाही फोडता आला नाही तर इतर चार फलंदाजांनी प्रत्येकी 2, 1, 4 आणि 2 धावा केल्या. अकरावा फलंदाज खातं न खोलताच नाबाद राहिला. जपानच्या काझुमा स्टेफर्डने शानदार गोलंदाजी करताना अवघ्या 7 धावांत 5 गडी बाद केले. अब्दुल सामोद व माकोटो यांनी प्रत्येकी दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. जपानच्या गोलंदाजासमोर मंगोलियाचा एकही फलंदाज मैदानावर टिकाव धरु शकला नाही. जपानने हा सामना एकतर्फी जिंकत सात सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

टी 20 सामन्यात अनेक विक्रम

बुधवारी झालेल्या या सामन्यात टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे. याआधी 2023 मध्ये ऑईल ऑफ मेन्सचा संघ 10 धावांवर गारद झाला होता. हे आव्हान स्पेनच्या संघाने अवघ्या 2 चेंडूत पूर्ण केलं होतं. यानंतर आता मंगोलिया संघाची नोंद झाली आहे. मंगोलियाचा संघ 12 धावांवर ऑलआऊट झाला व त्यांनी टी 20 क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमी स्कोअरचा विक्रम आपल्या नावे केला. याशिवाय, जपानने मंगोलियाविरुद्ध हा सामना तब्बल 205 धावांनी जिंकला. हा आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील चौथ्या क्रमाकांचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या विजयाची नोंद नेपाळच्या नावे आहे. 2023 मध्ये नेपाळने मंगोलियाविरुद्धचा सामना 273 धावांनी जिंकला होता. दुसऱ्या स्थानी झेक प्रजासत्ताक असून त्यांनी तुर्कस्थानविरुद्धची लढत 257 धावांनी जिंकली होती.

Advertisement
Tags :

.