ये भाई जरा देख के चलो...!
सातारा :
प्रसिद्ध अभिनेता राज कपूर यांच्या मेरा नाम जोकर या सिनेमातल्या 'ए भाई जरा देख के चलो, आगे भी नही पिछे भी नही' या गाण्याप्रमाणे साताऱ्यातल्या रस्त्याच्या कडेच्या गटाराकडे पाहून म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे. राजवाडा ते समर्थ मंदिर या रस्त्यावर गोल मारुती मंदिर परिसरात असा एक स्पॉट तयार झाला आहे. तर दुसरा स्पॉट बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आहे. भाजपाचे सुनील काळेकर यांनी पंताच्या गोटातील फक्त दोनच खड्यात झाडे लावली होती. त्यांच्या आंदोलनाचे पुढे काय झाले?, हे सातारकरांना न उलगडणारे कोडे आहे. परंतु तोपर्यंत सातारकरांना रस्त्याने चालताना जरा जपूनच चालावे लागणार आहे.
अवकाळीनंतर मान्सून जोडूनच लागुन राहिला. त्यामुळे पावसाने चांगल्या रस्त्यांचीही वाट लावली आणि खोदलेल्या रस्त्यांची तर त्याहूनही वाट लावली आहे. राजवाडा बसस्थानका समोरच खोदकाम केले होते तो खड्डा तसाच असल्याने त्यात पाणी साठून डबकी तयार झाली आहेत. जाता येता त्यामध्ये गाड्याची जागे रुतत आहेत. त्याचा धक्का गाड्यांना सहन करावा लागत आहे. गोल बागेच्या समोर प्रवीण पाटील यांच्या दुकानाच्या समोरुन ते पालिकच्या दुकानाबरोबर समांतर चर निर्माण झाली आहे. नेमकी गाडी तेथे आदळते. त्याचबरोबर गेल्या चार दिवसांपूर्वी राजवाडा ते समर्थ मंदिर या रस्त्यावर कडेला एका लेडीज टेलरच्या दुकानाच्या बाजूला गटर उघडे असल्याने तेथे एक ज्येष्ठ नागरिक पडल्याची घटना घडली होती. राजवाडा बाजूकडून वरती समर्थ मंदिरकडे चालत जाणाऱ्यांच्या लगेच हे गटर दिसत नाही. त्यामुळे वाहनांना बाजू देण्याच्या नादात या गटारात पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात खेडकडून कराडबाजूकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याला एका ठिकाणी गटर उघडे पडले आहे. तेथेही त्या गटारात पालिकेचे डायव्हरव्हशनचा बोर्ड टाकण्यात आला आहे. तो बोर्ड काढला काही दुचाकी चालक त्या गटारात पडण्याची भीती आहे. त्यामुळे साहजिकच 'ये भाई देख के चलो आगे भी नही पिछे भी नही' हे राज कपूर यांच्या सिनेमातले गाणे सातारकरांना आठवू लागते आहे.