For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेस्कॉमची अक्रम-सक्रम योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक

11:09 AM Aug 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
हेस्कॉमची अक्रम सक्रम योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक
Advertisement

2018 साली नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे योजनेकडे दुर्लक्ष : योजना रितसर बनवून घेण्याचे हेस्कॉमचे आवाहन : शेतकऱ्यांना मिळणार शिवारातील मोफत विद्युत पुरवठा

Advertisement

आण्णाप्पा पाटील /बहाद्दरवाडी 

अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांपैकी अन्न पिकविणारा हा बळीराजा आहे. या बळीराजाला मात्र अतिवृष्टी, दुष्काळ, योग्य हमीभाव आदी समस्यांचा सामना नेहमीच करावा लागतो. याच बळीराजाला शेतशिवारातील पिकांना पाणी देण्यासाठी हातभार लागावा, या उद्देशाने हेस्कॉमच्यावतीने 2018 साली अक्रम-सक्रम ही योजना सुरू केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी 50 रुपये भरून ही योजना मंजूर करून घेतली. मात्र ही योजना कायमस्वरूपी बनवून घेण्यासाठी याकडे दुर्लक्ष झाले आहे. शेतकऱ्यांसाठी लाभदायक असणाऱ्या या योजनेकडे बळीराजांनी दुर्लक्ष करू नये. हेस्कॉमकडून रितसर या योजनेचा लाभ घेऊन शिवारातील पीक पाण्याला बळकटी देण्याची गरज आहे. अक्रम सक्रम या योजनेअंतर्गत शिवारातील विद्युत पुरवठा मोफत देण्यात येत आहे. 2018 साली ही योजना सुरू करण्यात आली. पन्नास रुपये भरून नोंदणी करण्याचे कामकाज सुरू झाले बहुतांशी शेतकऱ्यांनी पन्नास रुपये भरून नोंदणी केली. त्यानंतर दहा हजार रुपये भरून उर्वरित कामकाज पूर्ण करून रितसर परवानगी घेणे गरजेचे आहे.

Advertisement

काही शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये भरून रितसर परवानगी घेतली. मात्र बहुतांशी शेतकऱ्यांचे या योजनेकडे दुर्लक्ष झाले. बऱ्याच शेतकऱ्यांनी रक्कम भरून योजना मंजूर करून घेतली व या योजनेचा लाभही घेत आहेत. मात्र रितसर योजनेचे कामकाज पूर्ण करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. विद्युत तारा, खांब यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. शिवारातील कूपनलिका अथवा विहिरीला जर पाणी असेल तरच शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची पिके घेऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याचे जीवन हे अधिकतर पाण्यावरच अवलंबून आहे. हे पाणी मिळविण्यासाठी बळीराला कूपनलिका व विहिरींची खोदाई करून पीक घेण्यासाठी धडपडताना दिसतो आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात विहिरी व कूपनलिकांची खुदाई केली आहे. त्या शिवारात अक्रम सक्रम योजनेअंतर्गत 10,000 रुपयांमध्ये आयपीसेएट जोडणी तसेच पायाभूत सुविधा पुरविण्यात येतात. यामध्ये विद्युत खांब व तारांचा पुरवठाही मोफत करण्यात येतो. त्यानंतर एका एचपीला 1680 रुपये याप्रमाणे आकारणी करण्यात येते. अशी ही त्यावेळीची योजना आहे.

ग्रामीण भागातील पिरनवाडी उपविभाग नंबर एक, पिरनवाडी विभाग नंबर दोन, उचगाव, वैभवनगर, काकती या भागातील शेतकऱ्यांनी पन्नास रुपये भरून एकूण 1217 जणांनी नोंदणी केली. यामध्ये 172 शेतकऱ्यांनी दहा हजार रुपये भरून रितसर कामकाज पूर्ण केले आहे. तर 1045 शेतकऱ्यांनी रक्कम भरलेली नाही. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी सदर शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम भरून अक्रम सक्रम योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. पिरनवाडी उपविभाग कार्यालय क्र. एक व दोन यामध्ये मच्छे पिरनवाडी, वाघवडे, संतिबस्तवाड, रणकुंडये, कर्ले, किणये, बहाद्दरवाडी, नावगे, बामणवाडी, बाळगमट्टी, झाडशहापूर, देसूर, राजहंसगड, येळ्ळूर, धामणे, सुळगे(ये) आदी गावांचा समावेश आहे. या भागातील शेतकऱ्यांना भेटून पिरनवाडी उपविभाग कार्यालयाचे साहाय्यक अभियंता सिद्धू गंगनगौडर, जुनियर अभियंता दीपानंद थरकार व हेस्कॉमचे कर्मचारी या भागातील शेतकऱ्यांना भेटून या योजनेची माहिती देत आहेत व सदर योजनेचे कामकाज पूर्ण करून घेण्याचे सांगत आहेत.

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

शेतकऱ्यांनी 50 रुपये भरून ही योजना सुरू केली आहे. काही शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम न भरताच शिवारातील पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे. विद्युत तारा, खांब यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची जोखीम न घेता जवळच्या हेस्कॉम कार्यालयाशी संपर्क साधून योजनेची पूर्तता करणे गरजेचे आहे. अन्य शेतकऱ्यांच्या शिवारात आलेल्या विद्युत खांबावरील तारांना विद्युत तारा जोडणी करून स्वत: विद्युत तारा जोडण्याचा धोका शेतकऱ्यांनी घेऊ नये, असेही सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी सहकार्य करावे

बहुतांशी शेतकऱ्यांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की, हेस्कॉमकडून नवीन आयपी सेट योजना बंद आहे. हेस्कॉम कार्यालयाला न जाताच अधिकाऱ्यांशी संपर्क न करताच असा तर्कवितर्क करण्यात येत आहे. नवीन योजना 2025 पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये 15000 रुपये डिपॉझिट भरावे लागत आहे. खांबांसाठी लागणारा खर्च शेतकऱ्यांनी स्वत: करायचा आहे. नवीन योजनेचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेल्या या योजनेच्या कामकाजाची पूर्तता शेतकऱ्यांनी त्वरित करून घ्यावी. असे हेस्कॉम ग्रामीण उपविभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंता दीपक धनपाल यांनी कळविले आहे.

Advertisement
Tags :

.