For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सव मंडळांच्या तक्रारी निवारण्यास हेस्कॉमकडून प्रारंभ

11:12 AM Aug 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सव मंडळांच्या तक्रारी निवारण्यास हेस्कॉमकडून प्रारंभ
Advertisement

बेळगाव : गणेशोत्सवापूर्वी शहरातील विजेच्या समस्या सोडविण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव आढावा बैठकीत केली होती. याची दखल घेत सोमवारी हेस्कॉमच्या शहर कार्यकारी अभियंत्यांनी शहरातील गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. काही ठिकाणी उंची वाढविणे गरजेचे आहे, अशा ठिकाणी येत्या दोन दिवसात काम सुरू करण्याच्या सूचना त्यांनी कंत्राटदारांना केल्या आहेत.

Advertisement

बेळगाव शहरात 370 हून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. कोरोनानंतर गणेशमूर्तीची उंची वाढविण्यात येत आहे. त्यामुळे गणेशमूर्तींना विद्युतवाहिन्यांचा स्पर्श होत आहे. विद्युतवाहिन्यांमुळे कोणताही अपघात होऊ नये, यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या सूचनेनुसार विद्युतवाहिन्यांची उंची वाढविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत केली होती. ज्या गणेशोत्सव मंडळांकडून हेस्कॉमकडे सूचना आल्या आहेत, त्या मंडळांना साहाय्यक कार्यकारी अभियंता तसेच इतर अधिकाऱ्यांनी भेटी देण्यास सुरुवात केली आहे.

सोमवारी शिवाजी रोड-कोनवाळ गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाला शहर कार्यकारी अभियंता मनोज सुतार तसेच साहाय्यक कार्यकारी अभियंता संजीव हम्मण्णावर यांनी भेट दिली. विद्युतवाहिन्यांची उंची वाढविण्यासोबतच अपघात टाळण्यासाठी एरियल बंच केबल घातल्या जाणार असल्याचे सुतार यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक संतोष पेडणेकर यांनी इतर मंडळांच्या समस्यांबाबतही हेस्कॉमचे लक्ष वेधून घेतले. यावेळी विद्युत कंत्राटदार विलास गोस्वामी, मंडळाचे अध्यक्ष विनायक पवार, निखिल नरसगौडा, सुभाष हंडे, मनोहर लोकुळकर यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.