सीमोल्लंघनासाठी हेस्कॉमने सहकार्य करावे
नवरात्र दसरा महोत्सव मंडळाची मागणी
बेळगाव : मध्यवर्ती नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सीमोल्लंघन कार्यक्रमासंदर्भात चर्चा केली. गुरुवार दि. 2 ऑक्टोबर रोजी मराठी विद्यानिकेतन शाळेच्या मैदानावर बेळगावचा ऐतिहासिक सीमोल्लंघन सोहळा होणार असून, यावेळी हेस्कॉमने सहकार्य करावे. तसेच उत्तम सेवा द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. गणेशोत्सव काळात हेस्कॉमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 2 ऑक्टोबर रोजी बेळगाव परिसरातील सर्व पालख्या सीमोल्लंघनासाठी एकत्र येतात. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने हेस्कॉमने सुरळीत वीजपुरवठा करावा. तसेच महामंडळाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. हेस्कॉमचे शहर कार्यकारी अभियंता मनोहर सुतार यांनी निवेदन स्वीकारून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अध्यक्ष आनंद आपटेकर, मल्लेश चौगुले, लक्ष्मण किल्लेकर, मुरगेश अंगडी, परिश्रम किल्लेकर, श्रीनाथ पवार, बळवंत जोतिबा धामणेकर, मनोज काकतकर यासह इतर उपस्थित होते.