हेस्कॉम अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल
► प्रतिनिधी / बेळगाव
शहापूर, अनगोळ शिवारात वीजेच्या समस्या निर्माण होत असल्याचे तरूण भारतने वृत्त प्रसिद्ध करताच हेस्कॉम प्रशासनाला जाग आली. सोमवारी हेस्कॉमच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यानी शिवाराला भेट देऊन शेतकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्या. तसेच लवकरच दुरूस्तीचे काम केले जाईल असे आश्वासन दिले.
अनगोळ-शहापूर, येळ्ळूर-मजगाव या शिवारांमध्ये सद्धा पालेभाज्यांसोबत इतर पिके घेतली जात आहेत. परंतु ट्रॉन्स्फॉर्मर नादुरूस्त असल्याने पिकांना पाणी देणे अवघड होत आहे. त्यामुळे पिके सुकत चालली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. ट्रॉन्स्फॉर्मर वारंवार नादुरूस्त होत असून त्याची वेळोवेळी दुरूस्ती केली जात नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता संजीवकुमार सुखसारे यांनी शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. ट्रॉन्स्फॉर्मरची तपासणी केली असता क्षमतेपेक्षा अधिक ट्रॉन्स्फॉर्मवर लोड टाकण्यात येत असल्यामुळे वारंवार टिसी नादुरूस्त होत असल्याचे स्पष्ट झाले. या संदभृ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढु असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी सेक्शन ऑफीसर तसेच कर्मचारी उपस्थित होते.