हेरवाडकर स्कूलच्या क्रीडामहोत्सवाला प्रारंभ
बेळगाव : येथील एम. व्ही. हेरवाडकर स्कूलच्या वार्षिक क्रीडामहोत्सवाला आरपीडी कॉलेजच्या क्रीडांगणावर उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे विश्वास पवार, प्राचार्या शोभा कुलकर्णी, अनिल गोरे, के. ए. हगीदळे, विश्वास गावडे, शंकर गावडे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज, म. गांधी, जवाहरलाल नेहरू आदी संघांनी पथसंचलन केले. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हटले. खेळाडूंनी मैदानावर क्रीडा ज्योत फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. यावेळी राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विविध क्रीडा प्रकारात 700 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. शिवाजी हाउसने उत्कृष्ट पथसंचलन करून प्रथम क्रमांक मिळवला. पथसंचलनाचे नेतृत्व इरा बंगने केले. पाहुण्यांची ओळख नव्या रेवणकरने करून दिली.