मीर मिरजीला मालिकावीराचा तर मंथन मयेकर सामनावीराचा पुरस्कार
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित 34 व्या दासाप्पा शानभाग चषक 16 वर्षाखालील मुलांच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंमित सामन्यात एम. व्ही. हेरवाडकर संघाने भातकांडे संघाचा 10 गड्यांनी एकतर्फी पराभव करून दासाप्पा शानभाग चषक पटकाविला. मंथन मयेकर ‘सामनावीर’ तर मिर मिरजी मालिकावीर ठरले. युनियन जिमखाना मैदानावर अंतिम सामन्यात हेरवाडकर संघाचा कर्णधार हर्ष नाशीपुडीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना हेरवाडकरच्या गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी करत भातकांडे संघाचा डाव 19.2 षटकात 111 धावात गारद केला. भातकांडेचा कर्णधार सुमित भोसलेने एकाकी लढत देताना 37 चेंडूत 9 चौकारांसह 58 धावा केल्या. हेरवाडकर संघातर्फे फिरकी गोलंदाज मंथन मयेकरने केवळ 7 धावात निम्मा संघ गारद केला आदित्य जाधवने 2 तर विराज माळवी, लक्ष खतायत व ओम बाणे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना हेरवाडकरने 13.3 षटकात बिनबाद 115 धावा करून सामना 10 गड्यांनी जिंकला. त्यात हर्ष नाशीपुडीने 42 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारांसह 62 तर लक्ष खतायातने 39 चेंडूत 5 चौकार व एक षटकारांसह 41 धावा केल्या. या जोडीने पहिल्या गड्यांसाठी नाबाद 115 धावांची भागीदारी केली. अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, संचालक चेतन बैलूर, दासाप्पा शानभाग ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर शानभाग, आर. डी. शानभाग, अजित शानभाग, किरण शानभाग, संदीप शानभाग, उल्हास शानभाग, सुशांत शानभाग, राहुल, उर्वी, अद्वेत व मोहित शानभाग हेरवाडकर शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी जिमखाना व्यवस्थापक महांतेश देसाई यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. मंथन मयेकर ‘सामनावीर’, उत्कृष्ठ फलंदाज सिद्धांत करडी, उत्कृष्ठ गोलंदाज विराज माळवी तर ‘मालिकावीर’ मीर मिरजी याना चषक देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून सुजित शिंदोळकर, गणेश मुतकेकर यांनी काम पाहिले.