For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेरवाडकर स्कूलकडे युनायटेड गोवन्स चषक

10:53 AM Oct 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
हेरवाडकर स्कूलकडे युनायटेड गोवन्स चषक
Advertisement

युनायटेड गोवन्स चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू इशान देवगेकर : उत्कृष्ट गोलरक्षक लक्ष्य खतायत

Advertisement

बेळगाव : युनायटेड गोवन्स रिक्रेशन क्लब आयोजित युनायटेड गोवन्स चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एम. व्ही. हेरवाडकर संघाने बलाढ्या सेंट पॉल्सचा टायब्रेकरमध्ये 3-0 असा पराभव करून युनायटेड गोवन्स चषक पटकाविला. इशान देवगेकर उत्कृष्ट खेळाडू तर लक्ष्य खतायत यांना उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले. टिळकवाडी येथील सुभाषचंद्रबोस लेले मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात हेरवाडकरने सेंट झेवियर्सचा 4-2 असा पराभव केला. या सामन्यात निर्धारीत वेळेत गोल कोंडी कायम राहिल्याने पंच कौशिक पाटीलने टायब्रेकर नियमाचा वापर केला. टायब्रेकरमध्ये हेरवाडकरने सेंट झेवियर्सला 4-2 असे हरवून अंतिम फेरी गाठली.

हेरवाडकरतर्फे अथर्व नाकाडी, प्रणित सप्ले, श्रेयश हैबत्ती, रितेश कदम यांनी गोल केले. तर झेवियर्सतर्फे रिहान व सौफ एम. यांनी गोल केले. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंटपॉल्सने भरतेशचा 5-0 असा पराभव केला. या सामन्यात 11 व्या मिनिटाला सेंटपॉल्सच्या सिद्धार्थच्या पासवर इरफानने पहिला गोल केला. 13 व्या मिनिटाला इशानच्या पासवर आराध्याने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 36, 38, 41 व्या मिनिटाला शोवनने सलग तीन गोल करून हॅट्ट्रीक साधत आपल्या संघाला 5-0 असा विजय मिळवून दिला. अंतिम सामन्याचे उद्घाटनला बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, युनायटेड गोवन्सचे सचिव इग्नेतेस मस्करेन्स, क्रीडा सचिव डॉ. जॉर्ज रॉड्रिक्स, जावेद चौधरी, विलियम मेनेंझिस आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यरांना उभय संघातील खेळाडूंची ओळख करुन देण्यात आली.

Advertisement

या सामन्यात 4 थ्या मिनिटाला सेंटपॉल्सच्या इशानने मारलेला वेगवान फटका हेरवाडकरचा गोलरक्षक लक्ष्य खतायतने उत्कृष्ट गोल अडविला तर 20 व्या मिनिटाला हेरवाडकरच्या अर्णव नाकाडीने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. त्यामुळे पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यास अपयश आले. दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी आक्रमक चढाया केल्या. पण दोन्ही संघांच्या बचावफळीपुढे गोल करण्यास अपयश ठरले. त्यामुळे पंच कौशिकने टायब्रेकरचा अवलंब केला. त्यामध्ये हेरवाडकरने सेंट पॉल्सचा  3-0 असा पराभव करून विजेतेपद मिळविले. हेरवाडकरतर्फे अथर्व नाकाडी, आर्णव व श्रेयश हैबत्ती  यांनी गोल केले. मात्र सेंट पॉल्सच्या आरूष, श्रेयस, इशान यांना गोल नोंदविता आले नाही.

सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या हेरवाडकर व उपविजेत्या सेंटपॉल्स संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट संघ भरतेश, उत्कृष्ट गोलरक्षक लक्ष्य खतायत-हेरवाडकर, उत्कृष्ट खेळाडू इशान देवगेकर सेंट पॉल्स यांना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळीं थॉमस पेस, सेबेस्टीयन सालढाणा, ओसवाद पाडेवाले, रिग्नल फर्नांडिस, राजन लोबो आदी सभासद उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून विजय रेडेकर, कौशिक पाटील, शुभम यादव, यश सुतार, ओमकार कुंडेकर व अखिलेश अष्टेकर यांनी काम पाहिले.

Advertisement
Tags :

.