40 हजाराचे हेरॉईन जप्त
दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात : मोटारसायकलही हस्तगत
प्रतिनिधी/ बेळगाव
जुन्या भाजी मार्केटजवळ हेरॉईन विकणारे दोन तरुण मार्केट पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्याजवळून सुमारे 40 हजार रुपये किमतीचे 48.22 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. बेळगाव पोलिसांनी अमलीपदार्थ विकणाऱ्याविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे.
मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, एस. बी. खानापुरे, नवीनकुमार, लक्ष्मण कडोलकर, सुरेश कांबळे, असिफ जमादार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यवर्ती बसस्थानकापासून जवळ असलेल्या जुन्या भाजी मार्केटजवळ रविवारी दुपारी ही कारवाई केली आहे. युनुस दस्तगीरसाब सनदी (वय 45) राहणार निजामुद्दीन गल्ली, न्यू गांधीनगर, मुशैब जरारअहमद पटेल (वय 27) राहणार सातवा क्रॉस, न्यू वीरभद्रनगर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. युनुस हा कुशनचे काम करतो. तर मुशैब हा वाहनचालक आहे. रविवारी दुपारी 1.15 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलमधून हेरॉईन आणून त्याची विक्री करताना त्यांना अटक झाली आहे.
छोट्या पाकिटातून हेरॉईनच्या पुड्या तयार करण्यात आल्या होत्या. अशा 200 पुड्या पोलिसांनी जप्त केल्या असून विक्रीसाठी आणलेली मोटारसायकलही ताब्यात घेतली आहे. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 21(बी) अन्वये या दोघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला असून मार्केट पोलीस पुढील तपास करीत आहेत.