मिझोराम-म्यानमार सीमेवर हेरॉईनसह रोकड जप्त
ईडीची कारवाई : अमली पदार्थ तस्करी रॅकेट उघडकीस
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
मिझोराम-म्यानमार सीमेवर मोठ्या कारवाईत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 35 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. संचालनालयाच्या ऐझॉल उप-क्षेत्रीय पथकाने मिझोराममधील ऐझॉल आणि चंफाई, आसाममधील करीमगंजमधील श्रीभूमी आणि गुजरातमधील अहमदाबाद येथे एकाचवेळी छापे टाकले. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. मिझोराम पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ईडीने चौकशी सुरू केल्यानंतर 4.724 किलो हेरॉइन जप्त केल्याचे उघड झाले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत अंदाजे 1 कोटी 41 लाख रुपये आहे. या प्रकरणासंदर्भात सहा जणांना अटक करण्यात आली. तपासात अनेक महत्त्वाचे आर्थिक संबंध उघड झाले. गुजरातमधील काही कंपन्यांनी मिझोराममधील कंपन्यांना स्यूडोएफेड्रिन गोळ्या आणि कॅफिन अॅनहायड्रस पुरवले. हे दोन्ही पदार्थ मेथॅम्फेटामाइन तयार करण्यासाठी वापरले जातात. मिझोराम कंपन्यांचे कोलकातामधील अनेक बनावट कंपन्यांशी देखील संबंध असल्याचे आढळून आले आहे. या कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात कॅफिन पुरवण्यात सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.