For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पडद्यामागचे हिरो!

06:15 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
पडद्यामागचे हिरो
Advertisement

भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत न भूतो न भविष्यती असा खेळ करत प्रतिस्पर्ध्यांना चितपट करत किंबहुना आसमान दाखवत उपांत्य फेरीत धडक मारली, कधी फलंदाजीच्या जीवावर तर कधी गोलंदाजांच्या जीवावर. परंतु या दोघांना खऱ्या अर्थाने साथ दिली ती भारतीय क्षेत्ररक्षकांनी. एखाद-दोन अपवाद वगळता पूर्ण 8 सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षण हे दृष्ट लागण्यासारखं होतं. मी मागील लेखात म्हटल्याप्रमाणे या विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक सामना संपल्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला मेडल देऊन गौरवण्यात येत आहे. अर्थात ही कल्पना दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून फिल्डिंग कोच टी. दिलीप यांचीच. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचनंतर दस्तूरखुद्द सचिन तेंडुलकर यांनी मेडल विनरचे नाव घोषित केलं. या मेडल वितरणामुळे खऱ्या अर्थाने टीममधील वातावरणात एक वेगळंच स्फूरण चढलंय. आतापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धांतील सर्वात उत्कृष्ट गोलंदाजी या विश्वचषक स्पर्धेत झाली. अर्थात याचीच चर्चा सर्वत्रच होताना दिसत आहे. जेवढे क्रेडिट भारतीय गोलंदाजांना आहेत तेवढेच क्रेडिट खऱ्या अर्थाने गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे यांना द्यावे लागेल. या भारतीय यशामागे टी. दिलीप आणि पारस म्हाम्ब्रे यांचा फार मोठा वाटा आहे.

Advertisement

प्रथम आपण टी. दिलीप यांच्याबद्दल चर्चा करू. टी. दिलीप हे मूळचे हैदराबादचे 2004 मध्ये लेवल वन कोच म्हणून त्यांची निवड झाली. हैदराबाद संघाच्या अंडर 14, अंडर 19चे कोच म्हणून काम पाहिले. त्यात त्यांची 2008 मध्ये एनसीएच्या कार्यप्रणालीत निवड झाली. 2009 ते 2012 मध्ये डेक्कन चार्जेर्सचे असिस्टंट फील्ड कोच म्हणून काम केले. पृथ्वी शॉ, शुभमन गिल यांना घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. 2017 मध्ये इंडिया ए आणि 2019 मध्ये भारतीय फिल्डिंग कोच म्हणून निवड झाली. भारतीय कप्तानाने कुठल्याही क्षेत्रक्षकाला कुठेही उभं करावं या पद्धतीची आखणी त्यांनी केली. सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये पाहिलं तर टी. दिलीप सतत सीमारेषेच्या चौफेर फिरत ऑब्झर्वेशन करत असताना दिसतात. नुसते धावा व विकेट काढून चालणार नाही तर क्षेत्ररक्षकाने किती धावा अडवल्या त्याची ते नोंद करत असतात. ड्रेसिंग रूममध्ये नुसतं बसून काम चालणार नाही, क्षेत्ररक्षकांच्या काय चुका होतात त्याच्याही ते नोंदी करत असतात.

Advertisement

दुसरीकडे पारस म्हांब्रेचा विचार केला तर 1996 च्या इंग्लंड टूरमध्ये गांगुली आणि द्रविडसोबत त्यांनी पदार्पण केलं होतं. परंतु फक्त दोन टेस्ट आणि तीन वनडे एवढीच त्यांची कारकीर्द राहिली. फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये पाच वेळा मुंबईला रणजी ट्रॉफी जिंकून दिलं. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी काम करत फास्ट बॉलरचा ग्रुप तयार केला. एनसीएमध्ये काम करताना फास्ट बॉलरला चांगल्या टीप देत खऱ्या अर्थाने त्यांनी वेगवान गोलंदाज घडवले. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याअगोदर तीन ते चार फास्ट बॉलर्स घेऊन आम्ही आक्रमकता दाखवणार हे त्यांनी बोलून दाखवलं होतं. आणि त्यांनी आपले शब्द अखेर तंतोतंत खरे केले. ते फास्ट बॉलरला घेऊन अतिशय छान प्लॅन आखतात. बुमराह, सिराज, शमी ज्या पद्धतीने फलंदाजांना नाचवतात, त्यांच्या मागे जो प्लॅन असतो तोच प्लॅन पारस सामन्याअगोदर त्यांना समजावून सांगतात. आणि सरते शेवटी या पूर्ण स्पर्धेत जे रिझल्ट आले ते आपण बघतच आहात. एकंदरीत या स्पर्धेत टी. दिलीप आणि पारस ज्या पद्धतीने पडद्यामागे डावपेच रचत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. एकंदरीत या पूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाजाबरोबर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांनी उच्च कोटीचे काम केले आहे. अजून एक सामना लीगमधला आपला बाकी आहे. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी हे दोन महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत. आता शेवटचा हात फिरवायचा बाकी आहे. त्यात दोन पडद्यामागचे हिरो नेमके आणखी काय डावपेच आखतात, ते बघणं औत्सुक्याचे  ठरणार आहे. तूर्तास तरी या पडद्यामागच्या हिरोंना सलाम!

Advertisement
Tags :

.