For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हा आहे चीनमधील ‘श्रावण बाळ’

06:09 AM Nov 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
हा आहे चीनमधील ‘श्रावण बाळ’
Advertisement

आईच्या ‘हास्या’साठी तिच्यासोबत करतोय भ्रमंती

Advertisement

आपली मुले केवळ स्वत:ची नव्हे तर आईवडिलांची काळजी घेऊ शकतील इतपत सक्षम व्हावीत अशी प्रत्येकाची इच्छा असते. परंतु प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होईलच असे नाही. सर्वसाधारणपणे चालण्या-फिरण्यास अक्षम ठरल्यावर आईवडिलांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. चीनमधील एका मुलाने असे काही करून दाखविले आहे, जे कळल्यावर लोक थक्क होत आहेत.

आई स्वत:च्या मुलाला उचलून घेत फिरताना तुम्ही पाहिले असेल. परंतु चीनमधील एक मुलगा स्वत:च्या आईला पाठीवर उचलून घेत भ्रमंती करतोय. या मुलाला चीनमधील श्रावण बाळ असे संबोधिले जात आहे.

Advertisement

आता 32 वर्षीय असलेल्या शाओ मा याच्या आईवडिलांचा त्याच्या बालपणीच अपघात झाला होता. या अपघातात त्याने स्वत:च्या वडिलांना गमाविले होते. तर त्याची आई स्वत:चे शरीर देखील हलवू शकत नव्हती. अशा स्थितीत शाओ मा आणि त्याच्या मोठ्या बहिणीने आईची देखभाल केली. मोठा झाल्यावर शाओ माने शेतांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि बचतीतून एक छोटे रेस्टॉरंट सुरू केले. त्याची बहुतांश कमाई आईच्या उपचारात खर्च व्हायची. परंतु त्याची आई हळूहळू व्हिलचेअरवर बसू लागली आणि काही प्रमाणात चालू लागली.

याचदरम्यान आईला सेरेब्रल एट्रोफी नावाचा आजार असल्याचे शाओला कळले.  या आजारातून आईला वाचविणे अवघड असल्याचे कळल्यावर शाओने उर्वरित काळात तिला आनंद मिळवून देण्याचा निर्णय घेतला. शाओ माने स्वत:चे घर आणि गाडी सर्वकाही विकून टाकले आणि आईसोबत चीनमध्ये भ्रमण सुरू केले.  यादरम्याने त्याने आईला पाठीवर उचलून घेत वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यास सुरुवात केली. या भ्रमंतीमुळे त्याची आई आनंदी होत आहे. सोशल मीडियावर शाओच्या कार्याचे लोक कौतुक करत असून त्याच्यासारखा मुलगा प्रत्येक घरात जन्माला यावा अशी कामना करत आहेत.

Advertisement
Tags :

.