आमचे अणुयुद्ध रोखण्यात साहाय्य
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकताच झालेला शस्त्रसंघर्ष अणुयुद्धापर्यंत जाऊ नये, यासाठी आम्ही यशस्वीरित्या प्रयत्न केला आहे. यासाठी आम्ही दोन्ही देशांना साहाय्य केले आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. त्यांनी सोमवारी आपल्या अधिकृत निवासस्थानी हे वक्तव्य केले.
शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचला होता. त्याचे रुपांतर अणुयुद्धात होण्याची दाट शक्यता होती. भारत आणि पाकिस्तान यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रे आहेत. अशा दोन देशांमधला संघर्ष अशा स्थितीला जाणे हे योग्य नव्हते. त्यामुळे आम्ही दोन्ही देशांना या संबंधीची कल्पना देऊन आम्ही संघर्ष थांबविण्यात साहाय्य केले. आमची भूमिका साहाय्यकाची होती आणि आम्ही ती यशस्वीरित्या पार पाडली आहे. याचा मला गर्व वाटतो, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोमवारच्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.
दोन्ही देशांची प्रशंसा
आमच्या प्रयत्नांना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी योग्य तो प्रतिसाद दिला आहे. शस्त्रसंघर्ष त्वरित आणि पूर्णपणे थांबला जावा, अशी आमची इच्छा होती. या इच्छेला भारत आणि पाकिस्तानने प्रतिसाद दिला आणि त्यांनी शस्त्रसंधी करण्याचे मान्य केले. यासाठी आम्ही या दोन्ही देशांची प्रशंसा करत आहोत. त्यांच्यातील ही शस्त्रसंधी स्थायी आणि प्रदीर्घकालीन राहील, असा आम्हाला विश्वास वाटतो, असेही प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
संघर्ष थांबल्यास व्यापार वाढवू
अमेरिका भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी व्यापार वाढविणार आहे. मात्र, त्यांचा एकमेकांमधला संघर्ष थांबला पाहिजे. संघर्ष थांबल्याशिवाय व्यापार शक्य होणार नाही, हे दोन्ही देशांना माहित आहे. आज जगात युद्धापेक्षा व्यापाराचे महत्व वाढले आहे, याचीही या दोन्ही देशांना कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी आता शस्त्रसंधीला मान्यता देण्याचे साहस दाखविले आहे. दोन्ही देशांनी जो समंजसपणा दाखविणे आवश्यक आहे, तो त्यांनी दाखविला, ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे, असेही विधान ट्रम्प यांनी त्यांच्या सोमवारच्या वक्तव्यात केले आहे.