दुचाकीवरील मुलांनाही हेल्मेटची सक्ती
केंद्रीय मोटार वाहन नियम तत्काळ लागू करण्याचे राज्य सरकारला निर्देश : उच्च न्यायालयाची ताकीद
बेंगळूर : दुचाकीवरून संचार करणाऱ्या मुलांनाही हेल्मेट आणि इतर सुरक्षा उपाय लागू असणारे केंद्रीय मोटार वाहन नियम तत्काळ लागू करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. नऊ महिन्यांपासून चार वर्षांच्या आतील मुलांना दुचाकीच्या मागील आसनावर बसवून नेत असताना त्यांना हेल्मेट परिधार करणे व सुरक्षा उपायांचे सक्तीने पालन करावे, यासंबंधी जागृती करणारे कार्यक्रम सुरूच ठेवावेत, असे निर्देश न्यायालयाने सक्षम प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. शिमोगा येथील कटील अशोक पै स्मारक कॉलेजच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख के. अर्चना भट यांनी जनहित याचिका दाखल केली होती.
सदर याचिकेवर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विभू बख्रु यांच्या नेतृत्त्वातील पीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला उपरोक्त आदेश दिले. बाजारपेठेस सुरक्षा उपकरणे उपलब्ध असल्याची खातरजमा केल्यानंतर हा नियम जारी करावा. त्यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम जारी करण्यात अधिकाऱ्यांनी अनेक उपाययोजना करून देखील त्यांची काटेकोर अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे नियम जारी करण्यासाठी राज्य सरकारने त्वरित कार्यवाही करावी, अशी ताकीद देऊन न्यायालयाने याचिका निकाली काढली.