आगामी लोकसभा निवडणुकीत हेगडेंना धडा शिकविणार
शालेय शिक्षण अन् साक्षरता मंत्री मधू बंगारप्पा यांचे प्रतिपादन : राज्यात 40 हजार शिक्षकांची कमतरता
कारवार : देशाचे संविधान बदलण्याची वल्गना करणारे, देशातील लोकशाही व्यवस्थेला विरोध करणारे कारवारचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना आगामी लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने उमेदवारी द्यावी लागणार आहे. त्यावेळी हेगडे यांना आम्ही योग्य तो धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्री मधू बंगारप्पा यांनी दिला. ते शनिवारी अंकोला येथील अतिथीगृहात पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर धर्मावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने आहेत. अशा किनारपट्टीवासियांच्या भावनाशी भाजप खेळ खेळत आहे. खेळ म्हणण्यापेक्षा तो भाजपचा अतिशय वाईट गुण बनून राहिला आहे. तथापि यापूर्वी ज्याप्रमाणे धर्माच्या नावावर मतदारांचे ध्रुवीकरण झाले. त्याप्रमाणे यावेळी आम्ही व्हायला संधी देणार नाही. गेल्या चार वर्षांपासून मतदारापासून दूर राहिलेले खासदार अनंतकुमार हेगडे, लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे प्रक्षोभक अन् वादग्रस्त वक्तवे करून सामाजिक स्वास्थ्याला सुरुंग लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने आश्वासने देऊन सत्ता काबीज केली. सत्ता आल्यानंतर आश्वासनांची पूर्तता करण्यात आली आहे. पूर्तता केलेल्या आश्वासनांच्या जोरावर लोकसभेला सामोरे जाणार आहोत. मतदार निश्चितपणे निराश करणार नाहीत असा विश्वास व्यक्त करून मंत्री बंगारप्पा पुढे म्हणाले, कारवार, शिमोगा जिल्ह्यासह सहा जिल्ह्यांचा दौरा करून पक्ष संघटना मजबुतीची जबाबदारी पक्षाने आपणावर सोपवली. त्या दिशेने प्रयत्न केले जात आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री बंगारप्पा म्हणाले, राज्यात 40 हजार शिक्षकांची कमतरता आहे. शिक्षकांच्या नेमणुकीसाठी हिरवा कंदील दाखविण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
20 हजार शिक्षकांना तांत्रिक प्रशिक्षण
प्रत्येक वर्षी राज्यातील 20 हजार शिक्षकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी अजीम प्रेम फौंडेशनशी करार करण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात करण्यात येईल. यावेळी आमदार सतीश सैल, आमदार भीमण्णा नाईक, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष साई गावकर आदी उपस्थित होते.