हेडा प्लायवुड्सच्या नूतन शोरुमचे उद्घाटन
ग्राहकांना जागतिक स्तरावरील ट्रेंड स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे आपले ध्येय
बेळगाव : प्लायवूड, लॅमिनेशन व इंटिरियर डेकोर सोल्युशन्समधील विश्वासार्ह नाव असणाऱ्या हेडा प्लायवुड्सच्या तिसऱ्या रेल्वेगेटनजीकच्या (हॉटेल नेटिव्हच्या बाजूला) नूतन शोरुमचे उद्घाटन शुक्रवारी थाटात करण्यात आले. केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्ज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, शरद पै, विजयकुमार हेडा, श्रीनारायण हेडा, आनंद हेडा, राधेश्याम हेडा, डॉ. प्रीती कोरे आदी उपस्थित होते. तीन दशकांपासून हेडा कुटुंबीय या व्यवसायात आहेत. 1996 मध्ये हेडा प्लायवुड्सचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी अवघ्या 950 स्क्वे. फूट इतक्या जागेमध्ये पहिली शोरुम सुरू करण्यात आली. त्यानंतर परंपरा आणि नवता यांचा मिलाफ करत हेडा प्लायवुड्सने आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. त्यामुळे वास्तूविशारद, डिझायनर, बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी ते एक विश्वासाचे स्थान ठरले.
ग्लोबल ते लोकल प्रवास सुरू
तिसऱ्या रेल्वेगेटेनजीक (हॉटेल नेटिव्हच्या बाजूला) नूतन शोरुम 5 हजार चौरस फूट इतक्या भव्य जागेत असून येथे, प्लायवुड, व्हेनियर, लॅमिनेट, मॉड्युलर फिटिंग्ज, आर्किटेक्चरल पृष्ठभाग आणि भारतातील आघाडीच्या ब्रँड आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरवठादारांकडून आयात केलेले सजावट साहित्य यासह दहा हजारहून अधिक प्रिमियम उत्पादने येथे उपलब्ध आहेत. एका अर्थाने ग्लोबल ते लोकल असा हा प्रवास असून आता आपल्याला हव्या असणाऱ्या जागतिक दर्जाच्या डिझाईन व प्लायवुड उत्पादनांसाठी महानगरांमध्ये जाण्याची गरज हेडा प्लायवुड्समुळे राहिलेली नाही. प्रारंभी अंजली हेडा यांनी स्वागत केले. हेडा कुटुंबीयांतर्फे डॉ. प्रभाकर कोरे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी हेडा प्लायवुड्सला शुभेच्छा दिल्या.
ग्राहकांचा विश्वास हीच संपत्ती
हेडा प्लायवुड्सने नेहमीच गुणवत्ता महत्त्वाची मानली आणि ग्राहकांचा विश्वास हीच संपत्ती मानली. आपल्या ग्राहकांना जागतिव स्तरावरील ट्रेंड स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे हे आपले ध्येय असल्याचे हेडा प्लायवुड्सचे संचालक आनंद हेडा यांनी सांगितले.