For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुसमळी पुलावरून अवजड वाहतूक राजरोस सुरू

09:52 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुसमळी पुलावरून अवजड वाहतूक राजरोस सुरू
Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता : पोलिसांना सोयीस्कर वाहनधारकांना अवघड

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील कुसमळीजवळील मलप्रभा नदीवरील पुलावरून अवजड वाहतुकीला बंदीचा आदेश बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दि. 22 जुलै बजावला आहे. परंतु सुरुवातीला काही दिवस रात्री बारानंतर या मार्गावरून सर्व अवजड वाहतूक पोलिसांच्या कृपेने सुरळीतपणे सुरू होती. आता राजरोसपणे अवजड वाहतूक सुरू असल्याने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.

Advertisement

बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दि. 21 जुलै रोजी कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची पाहणी केली होती. तसेच यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या पुलाच्या बांधकामाविषयीची सर्व माहिती जाणून घेतली होती. आणि त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे वाहतुकीला धोकादायक असल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, असा अहवाल बांधकाम खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 22 जुलै रोजी बेळगाव-चोर्ला-गोवा या मार्गावरील सर्व अवजड वाहतूक पूर्णपणे बंदीचा आदेश बजावला होता.

आदेशाची आठच दिवस अंमलबजावणी

जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गावरील पुलावरुन होणाऱ्या अवजड वाहतुकीचा आदेश बजावला. परंतु सुरुवातीचे चार-आठ दिवसच पोलीस खात्याने या मार्गावरील सर्व अवजड वाहतूक काटेकोरपणे बंद केली. मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच गत झाली. अवजड वाहतूक बंदीचा फायदा पोलीस खात्यातील काही पोलिसांनी चांगलाच उठविला. दिवसभर अवजड वाहतुकीला बंदी घालून रात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून किणये आणि जांबोटी या दोन्ही नाक्यावरील पोलिसांनी चांगलाच लाभ उठविला आहे.बेळगावहून गोव्याला जाणारी अवजड वाहने किणये येथे अडवून रात्री 12 नंतर आर्थिक व्यवहार झाल्यानंतर या मार्गावरून परवानगी दिली जात होती.

तसेच गोव्याहून बेळगावकडे जाणारी अवजड वाहने जांबोटी नाक्याजवळ अडवून रात्री 12 नंतर तेथूनही सोडण्यात येत होती. अशा पद्धतीने प्रत्येक अवजड वाहनधारकांकडून किणये येथे हजार ते दोन हजार रुपये तर जांबोटी नाक्याजवळ पाचशे रुपये दिल्यानंतर गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे अवजड वाहतुकीचा आदेश पोलिसांना सोयीस्कर आणि वाहनधारकांना अवघड होऊन बसला आहे. कुसमळी पुलावरुन होणारी चोरटी अवजड वाहतूक पूर्णपणे बंद झाली नाहीतर आता अवजड वाहतुकी संदर्भात जांबोटी-कुसमळी येथील युवकच रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

अवजड वाहतूक आता राजरोस सुरू

गेल्या आठवड्यापासून चोर्ला मार्गावरील कुसमळी पुलावरून होणारी अवजड वाहतूक राजरोसपणे सुरू असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा कुसमळी पुलाला धोका निर्माण झाला आहे. तसेच या मार्गावरील रस्त्याची दुरवस्था होत असल्याने गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावर रस्त्याची पूर्णपणे वाताहत होत आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी रस्त्यावरील अवजड वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे.

कणकुंबी जनतेला रस्त्यावर उतरावे लागण्याची वेळ

बेळगाव-चोर्ला-गोवा रस्त्यावरील कुसमळी जवळील मलप्रभा नदीवरील पुलावरून पुन्हा एकदा अवजड वाहतूक राजरोसपणे सुरू झाली असल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेला आदेश धुडकावून अवजड वाहतूक सुरू असल्याने पोलीस प्रशासन झोपी गेले आहे का, असा प्रश्न भिकाजी गावडे यांनी उपस्थित केला आहे. या अवजड वाहतुकीमुळे कुसमळी पुलाला धोका तर आहेच. पण त्याचबरोबर रस्त्याची देखील वाताहत होत असल्याने आता कणकुंबी भागातील जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलन हाती घेण्याची वेळ आली आहे. बससेवा बंद आणि अवजड वाहतूक सुरू झाल्याने जांबोटी, कणकुंबी भागातील प्रवासीवर्गाला समस्या निर्माण झाली आहे. रायचूर आणि रामदुर्ग आगाराच्या गोव्याला जाणाऱ्या बसेस कुसमळी पुलामुळे बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोन्ही बसेस बंद केल्या. परंतु बाराचाकी किंवा सोळाचाकी वाहतूक मात्र कुसमळी पुलावरून बिनधास्तपणे सुरू आहे. पोलिसांच्या आशीर्वादामुळे की एखाद्या दबावाखाली ही अवजड वाहतूक सुरू झाली आहे याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे.

- भिकाजी गावडे, अध्यक्ष पारवाड ग्रा. पं.

Advertisement
Tags :

.