बोरी पुलावर उद्या अवजड वाहनांना बंदी
मडगाव : बोरी पुलाच्या दुरूस्तीसाठी पुन्हा एकदा दोन आठवडे अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बोरी पुलाला कंपनमुक्त वातावरण आवश्यक असलेल्या गोलाकार बेअरिंग्ज बदलण्यासह गंभीर दुऊस्तीच्या कामांना चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बोरी पुलावर तात्पुरती वाहतूक बंदी जाहीर केली आहे. पीडब्ल्यूडी वर्क्स डिव्हिजन फोंडाच्या कार्यकारी अभियंत्याने जारी केलेल्या आदेशानुसार, खालील तारखांना अवजड वाहनांना बंदी असेल शनिवार दि. 29 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 (शनिवार सकाळी 8 ते रविवार सकाळी 8 वाजेपर्यंत) फोंड्याच्या बाजूने बंद. 6 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2025 (शनिवार सकाळी 8 ते रविवार सकाळी 8) मडगाव बाजूने बंद. या बंद कालावधीत, फोंडा आणि मडगाव दरम्यान प्रवास करणारी अवजड वाहने वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून पर्यायी उपलब्ध मार्गांनी वळवली जातील. जुन्या पुलावरील प्रलंबित पुनर्वसन काम सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी ही तात्पुरती बंदी आवश्यक असल्याचे पीडब्ल्यूडीने म्हटले आहे.