जांबोटी-चोर्ला रस्त्यावरुन होणारी अवजड वाहतूक तातडीने बंद करावी
जांबोटी-चोर्ला परिसरातील नागरिकांची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
► प्रतिनिधी / खानापूर
बेळगाव-चोर्ला रस्त्यावरील गोव्यासाठी मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक गेल्या आठवड्यापासून सुरु झाली आहे. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला असून अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. तसेच कुसमळी येथील कमकुवत झालेला पुलावरुन ही अवजड वाहतूक सुरु राहिल्यास केंव्हाही मोठा अनर्थ घडू शकतो. यासाठी चोर्ला रस्त्यावरुन गोव्याकडे होणारी अवजड वाहतूक तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी जांबोटी, कणकुंबी, चोर्ला या परिसरातील नागरिकांनी केली आहे. तसेच सोमवार दि. 15 रोजी जिल्हाधिकारी आणि तहसीलदाराना याबाबतचे निवेदन देण्यात येणार असल्याचे तरुण भारतशी बोलताना लक्ष्मण कसर्लेकर व किरण गावडे यांनी सांगितले.
बेळगाव, रामनगर, अनमोड या रस्त्यावरील महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण राहिल्याने रामनगर, अनमोड महामार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीस धोकादायक बनल्याने कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी रामनगर, अनमोड रस्ता दि. 30 सप्टेंबरपर्यंत सर्वच वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चोर्ला रस्त्यावरुन गोव्यासाठी मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरु झाली आहे. त्यामुळे गेले कित्येक वर्षे चोर्ला रस्ता पूर्णपणे उदध्वस्त झाला होता. याचा पाठपुरावा करुन नुकताच रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र सुरु झालेल्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. तसेच कुसमळीजवळ मलप्रभा नदीवर असलेला पूल पूर्णपणे कमकुवत झालेला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खाते आणि महामार्ग प्राधिकरणाने या पुलावरुन अवजड वाहतूक करण्यात येऊ नये, असे फलकही लावलेले आहेत. असे असताना या पुलावरुन गोव्यासाठी मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरु झाली आहे. कमकुवत झालेल्या पुलावरुन अवजड वाहतूक सुरु राहिल्यास केंव्हाही मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे या रस्त्यावरुन अवजड वाहतूक तातडीने बंद करावी, अशी मागणी जांबोटी, कणकुंबी, चोर्ला भागातील नागरिकांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. जर पुलाला धोका निर्माण झाल्यास या भागातील संपूर्ण नागरी वाहतूक ठप्प होणार असून या भागातील शंभर ते सव्वाशे खेड्यांना अनेक समस्यांना तेंड द्यावे लागणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.