महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव-चोर्ला-गोवा अवजड वाहतूक राजरोसपणे सुरू

11:00 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव पोलिसांचा आशीर्वाद : कुसमळीजवळील मलप्रभा नदीवरील पुलावरून अवजड वाहतूक बंदच्या बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

Advertisement

वार्ताहर/कणकुंबी

Advertisement

बेळगाव-चेर्ला-गोवा या रस्त्यावरील कुसमळीजवळील मलप्रभा नदीवरील पुलावरून अवजड वाहतूक बंदचा बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही बेळगाव पोलिसांच्या आशीर्वादाने या मार्गावरील अवजड वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे जांबोटी-कणकुंबी भागातील नागरिक पुन्हा एकदा अवजड वाहतूक बंदीसाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत. बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दि. 22 जुलैला कुसमळी पुलावरून अवजड वाहतूक बंदीचा आदेश बजावला आहे. परंतु सुरुवातीला काही मोजकेच दिवस अवजड वाहतूक बंद करण्यात आली. मात्र त्यानंतर रात्री 12 नंतर या मार्गावरून सर्व अवजड वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरळीतपणे सुरू होती, आता राजरोसपणे अवजड वाहतूक सुरू असल्याने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशाची पायमल्ली झाली असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दि. 21 जुलै रोजी कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची पाहणी केली होती. तसेच यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या पुलाच्या बांधकामाविषयीची सर्व माहिती जाणून घेतली होती. आणि त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे वाहतुकीला धोकादायक असल्याने या मार्गावरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, असा अहवाल बांधकाम खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दि. 22 जुलै रोजी बेळगाव-चोर्ला-गोवा या मार्गावरील सर्व अवजड वाहतूक पूर्णपणे बंदीचा आदेश बजावला होता.

आदेशाची आठच दिवस अंमलबजावणी 

जिल्हाधिकाऱ्यांनी या मार्गावरील पुलावरुन होणाऱ्या अवजड वाहतुकीचा आदेश बजावला. परंतु सुरुवातीचे चार-आठ दिवसच पोलीस खात्याने या मार्गावरील सर्व अवजड वाहतूक काटेकोरपणे बंद केली. मात्र पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच गत झाली. अवजड वाहतूक बंदीचा फायदा पोलीस खात्यातील काही पोलिसांनी चांगलाच उठविला. दिवसभर अवजड वाहतुकीला बंदी घालून रात्री बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत अवजड वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून किणये आणि जांबोटी या दोन्ही नाक्यावरील पोलिसांनी चंगळच केली. बेळगावहून गोव्याला जाणारी अवजड वाहने किणये येथे अडवून रात्री 12 नंतर आर्थिक व्यवहार झाल्यानंतर या मार्गावरून परवानगी दिली जात होती. तसेच गोव्याहून बेळगावकडे जाणारी अवजड वाहने जांबोटी नाक्याजवळ अडवून रात्री 12 नंतर तेथूनही सोडण्यात येत होती. अशा पद्धतीने प्रत्येक अवजड वाहन धारकांकडून किणये येथे हजार ते दोन हजार रुपये तर जांबोटी नाक्याजवळ पाचशे रुपये दिल्यानंतर गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे अवजड वाहतुकीचा आदेश पोलिसांना सोयीस्कर व वाहन धारकांना अवघड होऊन बसला आहे. कुसमळी पुलावरुन होणारी चोरटी अवजड वाहतूक पूर्णपणे बंद झाली नाही तर अवजड वाहतुकीसंदर्भात जांबोटी-कुसमळी येथील युवकच रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती कुसमळीचे युवा व  कार्यकर्ते अनंत सावंत यांनी दिली.

 अवजड वाहतूक आता राजरोसपणे सुरू 

गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून चोर्ला मार्गावरील कुसमळी पुलावरून होणारी अवजड वाहतूक राजरोसपणे सुरू असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा कुसमळी पुलाला धोका निर्माण झाला आहे. तसेच या मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी रस्त्यावरील अवजड वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. या अवजड वाहतुकीमुळे कुसमळी पुलाला धोका तर आहेच. शिवाय रस्त्याची देखील वाताहत होत असल्याने आता कणकुंबी भागातील जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलन हाती घेण्याची वेळ आली आहे.

बेळगाव पोलिसांच्या आशीर्वादाने अवजड वाहतूक

मध्यंतरी काही दिवस कुसमळी पुलावरून बससेवा देखील बंद करण्यात आली होती. परंतु पोलािसांच्या कृपेने अवजड वाहतूक मात्र राजरोसपणे सुरू होती. ‘तरुण भारत’ने याविषयी आवाज उठविताच अवजड वाहतुकीबरोबरच प्रवासी वाहतूक (बस) पुन्हा सुरू झाली. सदर अवजड वाहतुकीला बेळगाव (किणये चेक पोस्ट) पोलिसांचा वरदहस्त असल्याने कुसमळी पुलाला धोका निर्माण झाला आहे. गोव्याकडून येणारी अवजड वाहने मात्र कुसमळीऐवजी खानापूर मार्गे पाठविण्याचे काम खानापूर (जांबोटी) पोलीस खाते करत आहे. परंतु किणये चेक पोस्टवरील पोलिसांच्या आर्थिक व्यवहारातून अवजड वाहतुकीला चालना मिळत आहे. बेळगाव पोलीस खात्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.

गोव्याहून येणाऱ्या अवजड वाहनांची खानापूरमार्गे वाहतूक

खानापूरचे पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जांबोटी आऊट पोस्ट पोलीस जांबोटी येथे बॅरिकेड्स लावून गोव्याकडून येणारी अवजड वाहने खानापूर मार्गे पाठवून देतो. परंतु बेळगाव किणये मार्गे येणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे कुसमळी पुलावरून गाड्या येत असल्याने स्थानिक नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही कुसमळी पुलावरून अवजड वाहतूक बंद केली आहे. कुसमळीऐवजी खानापूरमार्गे गाड्या वळविण्यात आल्याने जांबोटी-खानापूर वाहतूक देखील अधूनमधून कोलमडत आहे.

- एन. के. पाटील, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जांबोटी ओपी

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article